
नांदेड – फोटोशूट करणारे दोन बालके तलावात बुडून मृत्युमुखी पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. या दोन्ही बालकांचे मृतदेह तलावाबाहेर काढण्यात आले आहेत. सोनखेड पोलिसांनी जीवरक्षक दलाच्या मदतीने हे मृतदेह शोधण्यात यश मिळवले आहे.
नवीन नांदेडातील बळीरामपूर येथील शेख बाबर शेख जाफर (वय १५) आणि जुन्या नांदेडातील उमर कॉलनी, देगलूर नाका येथील महमद रेहान महमद युसुफ (वय १५) हे दोघेजण लोहा तालुक्यातील किवळा साठवण तलाव येथे फोटो शूटिंगसाठी गुरुवारी गेले होते. या फोटो शूटिंग दरम्यान त्यांचा पाय घसरून ते किवळा साठवण तलावाच्या सांडव्याच्या पाण्यामध्ये बुडाले. सायंकाळी जवळपास पाच वाजता घडलेल्या या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला आहे.
घटनेची माहिती मिळताच सोनखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जीवरक्षक दलाच्या मदतीने तलावात दोन्ही मुलांचा शोध घेतला. दोघांचेही मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आले आहेत. याप्रकरणी सोनखेड ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे.



