प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात १२ नगरपरिषदेसह एका नगरपंचायतीच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ

२६९ सदस्यांसाठी २ डिसेंबरला मतदान तर ३ डिसेंबर रोजी मतमोजणी, एकूण २ लाख ९८ हजार ४० मतदार बजावणार मतदानाचा हक्क, उमेदवारी ऑनलाईन पद्धतीने स्वीकारली जाणार 

नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील १२ नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या २६९ सदस्यांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान तर बुधवार ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. नांदेड जिल्ह्यात एकूण १३ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीचा कार्यक्रम ४ नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केला आहे. या नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्याचवेळी या ठिकाणच्या निवडणुकांची तयारी अंतिम टप्प्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्ह्यात देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगांव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड आणि लोहा या नगरपरिषद तसेच हिमायतनगर नगरपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यात १२ नगरपरिषद व एका नगरपंचायतीच्या निवडणूक कार्यक्रमाच्या क्षेत्रात १ लाख ४७ हजार १६५ पुरुष तर १ लाख ५० हजार ८५८ स्त्री व इतर २० असे एकूण २ लाख ९८ हजार ४० मतदार आपल्या मतदानाचा बजावतील.

जिल्ह्यात १२ नगरपरिषदांमध्ये देगलूर नगरपरिषद ही ब वर्गवारीची असून बाकी सर्व क वर्गवारीच्या नगरपरिषद व नगरपंचायत आहेत. या सर्व नगरपरिषद व नगरपंचायतीमध्ये एकूण प्रभाग संख्या १४१ आहे. या निवडणुकांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास १० नोव्हेंबरपासून सुरुवात होईल. नामनिर्देशपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख १७ नोव्हेंबर रोजी ३ वाजेपर्यत राहील. या कालावधीत येणाऱ्या रविवार या सुट्टीच्या दिवशी नामनिर्देशनपत्र स्विकारण्यात येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी व वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी १८ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील नसलेल्या ठिकाणी २१ नोव्हेंबरपर्यंत; तर अपील असलेल्या ठिकाणी २५ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी २६ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द होईल. २ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाची वेळ असेल. मतमोजणी सर्व संबंधित ठिकाणी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या क्षेत्रापुरती आचारसंहिता संपुष्टात येईल.

नामनिर्देशन स्विकारण्याची प्रक्रीया संगणक प्रणालीद्वारे राबविण्यात येत असल्याने नामनिर्देशन व शपथपत्र राज्य निवडणूक आयोगाकडील सॉफ्टवेअर द्वारेच भरणे आवश्यक आहे. निवडणूक लढवू इच्छीत असणाऱ्या उमेदवारांनी https://mahasecelec.in संकेतस्थळावर स्वत: नोंदणी करावी व नामनिर्देशनपत्रामध्ये तसेच शपथपत्रामध्ये माहिती भरावी. त्याची प्रिंट घेवून त्यावर स्वाक्षरी करुन ते निवडणूक निर्णय अधिकऱ्यांकडे विहित वेळेत व विहित पध्दतीने दाखल करावे. अशा प्रकारे भरलेला व स्वाक्षरी केलेला नामनिर्देशन पत्राचा अर्ज नामनिर्देशनपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येईल.

राखीव जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना जात प्रमाणपत्र व जातवैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. परंतु जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास त्यासाठी पडताळणी समितीकडे केलेल्या अर्जाची पोहोच पावती नामनिर्देशनपत्रासोबत सादर करण्याची मुभा आहे. तसेच नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी निवडून आल्याच्या दिनांकापासून ६ महिन्यांच्या आत शासनाच्या २ नोव्हेंबर २०२५ च्या अध्यादेशाद्वारे तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार कार्यवाही करण्याचे तसेच उमेदवार निवडून आल्याचे घोषित झाल्याच्या दिनांकापासून अधिनियमातील तरतुदीनुसार जातवैधता प्रमाणपत्र सादर न केल्यास त्यांची निवड भूतलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल असे विहित केलेले हमीपत्र उमेदवारांने सादर करणे आवश्यक आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदार यादीतील संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर (**) असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. असे मतदार कुठल्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, याबाबत त्यांना आवाहन करण्यात येईल. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्यानंतर अशा मतदारांकडून तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहे, याबाबत विहित नमुन्यात अर्ज भरून घेतला जाईल. त्याने नमूद केलेले मतदान केंद्र वगळता त्यास उर्वरित कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान करता येणार नाही; परंतु प्रतिसाद न मिळाल्यास संभाव्य दुबार नाव असलेला मतदार मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून त्याने इतर कोणत्याही मतदान केंद्रावर मतदान केले नसल्याबाबत किंवा करणार नसल्याचे विहित नमुन्यातील हमीपत्र लिहून घेण्यात येईल. त्याचबरोबर त्याची काटेकोरपणे ओळख पटल्यानंतरच त्याला संबंधित मतदान केंद्रावर मतदान करण्याची मुभा देण्यात येईल.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!