नांदेड जिल्हा

पांडुरणासह आता भोकर शहरही हादरले, तीन ठिकाणी हादरे 

स्वारातीम विद्यापीठाच्या अर्थ सायन्स विभागात धक्क्यांची नोंद, केंद्रबिंदू बोरवाडी गावाच्या आसपास, धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर १.१ एवढी नोंदविली 

नांदेड – भोकर तालुक्यातील पांडुरणा गावात झालेल्या हादऱ्यांची मालिका आता भोकर शहरापर्यंत पोहोचली. आहे. पांडुरणा गावात शुक्रवारी सायंकाळी गावच्या पूर्व आणि पश्चिम दिशेला भूगर्भातून गूढ आवाज आले होते. त्यामुळे गावकरी भयभयीत झाले होते. या हादऱ्यांची मालिका शनिवारी भोकर शहरातील शाहू शाळा शेखफरीद नगर, हनुमान नगर आणि किनवट रोड परिसरात पोहोचली आहे. शनिवारी सकाळी दहा ते सव्वा दहा वाजेदरम्यान भूगर्भातील हादरे जाणवले आहेत. त्यामुळे या हादऱ्यांची व्याप्ती आता वाढत असून नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात या हादऱ्यांची नोंद झाली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि भोकरचे तहसीलदार विजय गुंडमवार यांनी नागरिकांना आता सतर्कतेचे आवाहन केले आहे.

भोकर तालुक्यातील पांडुरणा या गावाच्या पूर्वेला व पश्चिमेला १९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता भूगर्भातून आवाज आल्याची ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या आवाजाची, धक्क्याची कुठलीही नोंद झाली नसल्याचे आढळून आले. सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागाचे प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना देखील माहिती घेण्यास सांगितले होते; पण अर्थ सायन्स विभागात सुद्धा कुठलीही नोंद झाली नव्हती.

पुन्हा आज २० सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सव्वा दहा वाजता भोकर शहरात शाहू शाळा शेखफरिद नगर, हनुमान नगर आणि किनवट रोड परिसर या ठिकाणी जमिनीतून आवाज येऊन दोन वेळा जमीन हादरल्याची माहिती शहरवासियांनी प्रशासनाला दिली. त्यानुसार पुन्हा एकदा राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर तपासले असता या धक्क्याची कुठलीही नोंद संकेतस्थळावर झाली नव्हती; परंतु स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील अर्थ सायन्स विभागात सदर दोन धक्क्यांपैकी दहा वाजता बसलेल्या धक्क्याची नोंद झाली आहे. या धक्क्याची तीव्रता रिश्टर स्केलवर १.१ एवढी नोंदविण्यात आली आहे. या धक्क्यांचा केंद्रबिंदू बोरवाडी गावाच्या आसपास असल्याचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थ सायन्स विभागाचे प्रा. डॉक्टर टी. विजयकुमार यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे.

सदर धक्का हा अतिसौम्य प्रकारचा आहे व अशा पद्धतीचे कंपन हे अतिवृष्टीमुळे भूजल पातळीत होणाऱ्या पुनर्भरण अथवा उपसा यामुळे निर्माण होणाऱ्या हायड्रोस्टॅटिक दबावामुळे होत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आल्याचे डॉ. टी. विजयकुमार यांनी सांगितले. ही सामान्य बाब असून प्रतिवर्षी बऱ्याच भागात असे जाणवते. गूढ आवाज येणे ही स्थानिक स्वरुपातील बाब असल्याचे यापूर्वी देखील निर्दशनास आले आहे. या धक्क्यामुळे कुठलीही जीवित व वित्त हानी झाली नसल्याबाबत तहसीलदार भोकर यांनी जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास कळविले आहे.

नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क रहावे. तसेच गावात ज्या लोकांच्या घराचे छत पत्र्याचे आहे व त्यांनी पत्र्यावर आधारासाठी दगड ठेवले आहेत त्यांनी सुरक्षिततेचा भाग म्हणून त्वरित दगड काढून घ्यावेत व पत्रे बोल्टने फिट करून घ्यावीत. पुन्हा असा आवाज आलाच तर पटकन घराबाहेर मोकळ्या जागेत गोळा व्हावे व प्रशासनाला 02462- 235077 या क्रमांकावर संपर्क करून कळवावे तसेच कोणत्याही अफवांनावर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जनतेला केले आहे.

तहसीलदार गुंडमवार यांची पांडुरणा येथे भेट…भोकरचे तहसीलदार विजय गुंडमवार यांनी शनिवारी पांडुरणा या गावात भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली. गावकऱ्यांनी भूगर्भातून आलेल्या गूढ आवाजाबाबत माहिती दिली. त्यावेळी प्रशासन या विषयातील तज्ञांच्या संपर्कात असून अधिक माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा परिस्थितीत गावकऱ्यांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी असे आवाहन गुंडमवार यांनी केले. गावकऱ्यांनी घटनेबाबत माहिती द्यावी प्रशासनाच्या संपर्कात राहावे असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!