
नांदेड : राज्यात ४ दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील लेंडी धरणाच्या प्रभावक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने रावणगाव, हसनाळ, भिंगोली, भासवाडी या गावामध्ये पाणी शिरले. या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात जनावरांचे नुकसान होऊन ५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अनेक हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसानही झाले आहे. या नुकसानीचा अंदाज घेऊन नुकसानग्रस्त गावातील नागरिकांना शासनाच्यावतीने सर्वतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदा (विदर्भ, तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ), आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. यावेळी मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत धनादेश स्वरुपात मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते वितरीत करण्यात आली.
जिल्ह्यात पावसाने झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन हे मंगळवारी सायंकाळी नांदेड दौऱ्यावर आले. त्यांनी मुखेड तालुक्यातील हसनाळ या गावातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन येथील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच मारजवाडी या पुर्नवसीत गावालाही त्यांनी भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले. त्यांनी स्थानिक नागरिकांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यांच्या या समस्यांबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन त्या सोडविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. तसेच या भागातील नुकसानग्रस्तांचा रोष जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर असल्याचे कळल्यानंतर याबाबत लवकरच चौकशी करुन दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी आमदार डॉ. तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, देगलूरचे उपविभागीय अधिकारी अनुप पाटील, परिसरातील शेतकरी, नागरिक आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी या भागात पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती मंत्री गिरीश महाजन यांना दिली.
दरम्यान, मुखेड – उदगीर रस्त्यावरील धडकनाळ येथील पुलावरून १८ ऑगस्ट रोजी एक कार व एका ऑटोमधील सात जण पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. यातील नारायण इबिते, गौडगाव कर्नाटक, आसिफ शेख, उदगीर आणि मोहम्मद शोएब, निझामाबाद या तिघांना वाचवण्यात उदगीर अग्निशमन दलाला यश आले आहे. या घटनेत समीना शेख वय ४८ रा. जागतियाल, तेलंगाणा, हसीना शेख वय २८ रा. जागतियाल, तेलंगाणा आणि महेबूब शेख रा. गवंडगाव ता. देगलूर या तिघांना जलसमाधी मिळाली आहे. तिघांचेही मृतदेह सापडले आहेत. आफरिन शेख वय ३० रा. जागतियाल, तेलंगाना ही एक महिला मात्र अद्यापही बेपत्ता आहे तिचा शोध सुरूच आहे.
मृतांच्या वारसदारांना प्रत्येकी ४ लाखांची मदत… पुरामुळे हसनाळ येथील पाच जणांचा मृत्यू झाला होता त्यांच्या वारसदारांना यावेळी प्रत्येकी ४ लाख रुपयांची मदत धनादेश स्वरुपात आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते देण्यात आली. मृत्यू झालेल्या व्यक्ती व त्यांचे वारसदार याप्रमाणे आहेत. पुरामध्ये बळी गेलेले पिराजी म्हैसाजी थोटवे (वय ७०) यांचे वारस अर्थात मुलगा मारोती पिराजी थोटवे यांना ही मदत प्रदान करण्यात आली. मयत चंद्रकला विठ्ठल शिंदे (वय ३५) त्यांचे पती विठ्ठल व्यंकटराव शिंदे यांना, मयत ललिताबाई गोविंद भोसले (वय ६०) यांची मुले जगदीश गोविंद भोसले व मधुकर गोविंद भोसले यांना, मयत भीमाबाई हिरामण मादाळे (वय ६५) यांचे मुले संग्राम हिरामण मादाळे, राहुल हिरामण मादाळे आणि गंगाबाई गंगाराम मादाळे (वय ६५) त्यांची मुलगी लालाबाई व्यंकट मादाळे यांना मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.



