राजकीय

नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकरांकडून गद्दारीला पुन्हा एकदा दिला उठावाचा मुलामा..!

कल्याणकर म्हणाले, विकासासाठी दिली शिंदेंची साथ, निवडून दिलेल्या मतदारांशी बेईमानी कशी करायची याचाही आला होता मनात विचार

नांदेड – गद्दार, ५० खोके अशा शब्दांनी हिणवल्या गेलेल्या नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी शिवसेना फुटीच्या वेळी केलेल्या गद्दारीला उठावाचा मुलामा देऊन आपण केलेली कृती ही नांदेडच्या विकासासाठी केली होती असे सांगून आपल्या कृतीवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने नांदेडचा ५० वर्षात न झालेला विकास आणि पुढच्या ३० वर्षात न होणारा विकास आपण केला. अडीच हजार कोटींची कामे नांदेड उत्तरमध्ये केल्याचा दावा केला आहे.
राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी शनिवारी नांदेडमध्ये शिवसेना फुटीदरम्यान गुवाहाटी दौऱ्यातील आमदार कल्याणकरांचे किस्से सांगितले होते. त्यात नांदेडचे आमदार बालाजी कल्याणकर हे जेवण करत नव्हते, इतकेच नव्हे तर त्यांनी हॉटेलच्या इमारतीवरून उडी मारण्याचीही धमकी दिली होती, असेही स्पष्ट केले. त्यांना सावरण्यासाठी दोघा जणांना ठेवावे लागले असेही ते म्हणाले होते. या वक्तव्यानंतर नांदेड उत्तरचे आमदार कल्याणकरांच्या गद्दारीचा राज्यात पुन्हा एकदा भांडाफोड झाला. हा भांडाफोड त्यांच्या मतदारसंघातच करण्यात आला. शिवसेना फुटीदरम्यान गुवाहाटीमध्ये माध्यमांचे प्रतिनिधी पोहोचले असताना बालाजी कल्याणकर हे इतर आमदारांच्या मागे लपत असल्याचेही नांदेडकरांनी बघितले आहे. नांदेडमध्ये शनिवारी डॉ. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या भाषणावेळी त्यांच्या मनातील चलबिचल आणि चेहऱ्यावरील हावभाव हे निश्चितच पाहण्यासारखे होते.

या सर्व प्रकरणाची सारवासारव आमदार कल्याणकर यांनी रविवारी माध्यमांसमोर केली. आपल्यालाही गुवाहाटी दौऱ्यातील या सर्व गोष्टी सांगायच्या होत्या; मात्र आपण सांगितल्या तर लोक विश्वास कसा ठेवतील, इतरांनी सांगितल्या तर त्यावर विश्वास बसतो असे ते म्हणाले. निवडून दिलेल्या मतदारांचा विश्वासघात कसा करायचा ही बाब मनात वारंवार येत होती. निवडून दिलेल्या मतदारांशी बेईमान कसे व्हायचे याचाही विचार येत होता. त्याबाबत भीतीही वाटत होती; मात्र शिरसाट यांनी आपल्याला धीर दिला. एकनाथ शिंदे यांनीही पाठराखण केली. आगामी काळात तुला काहीही कमी पडू देणार नाही या शब्दात त्यांना दिलासा दिला होता. त्यामुळे आपणाला काहीसे हायसे वाटले आणि पुढे नांदेडचा आपण किती विकास केला आहे हे आपण पाहिलेच असल्याचे त्यांनी सांगितले. नांदेडचा ५० वर्ष न झालेला विकास आपण केला. आपण केलेल्या कामाइतके कामे पुढे ३० वर्षे कोणीही करू शकणार नाही असा दावा करताना आ. कल्याणकर यांनी अडीच हजार कोटींचे कामे केल्याचा दावाही केला आहे.

एकूणच सामाजिक न्यायमंत्री शिरसाट यांनी नांदेड दौऱ्यात केलेल्या वक्तव्यामुळे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या  शिवसेनेतील गद्दारीला पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. त्यांच्या वक्तव्याबाबत आता अनेक दिवस सारवासारव करावीच लागणार आहे. शिवसेना चे प्रमुख उद्धव ठाकरे हे ६ नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्हा दौऱ्यावर मुक्कामी येत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू होईल, हे निश्चित.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!