प्रशासकीय

नांदेड शहरात रविवारपासून केले जाणार अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे  

महसूल विभाग आणि महापालिकेच्या ७४ संयुक्त पथकांची स्थापना, कोणत्याही खाजगी व्यक्तीच्या अमिषाला बळी पडू नका, पंचनामे मोफत होणार

नांदेड – नांदेड शहरात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान असून अनेक कुटुंब आजही सावरले नाहीत. या नुकसानीचे पंचनामे रविवारपासून महसूल विभाग आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाकडून केले जाणार आहेत. या पंचनाम्यांसाठी ७४ पथकांची स्थापना करण्यात आली आहे. पंचनाम्यांसाठी कोणत्याही संघटना, खाजगी व्यक्तीच्या आमिषाला बळी पडून आर्थिक व्यवहार करू नये, हे पंचनामे अगदी मोफत होणार असल्याचे नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी स्पष्ट केले आहे. या संयुक्त पंचनाम्यांच्या अनुषंगाने शनिवारी नांदेडमध्ये महसूल विभाग आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी पार पडली.

नांदेड शहर आणि जिल्हाभरात शुक्रवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाला होता. ढगफुटी सदृश्य पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले. अनेक घरांमध्ये पाणी शिरले. नांदेड शहरांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली. बहुतांश नगरामध्ये रस्त्यांसह घरामध्ये पाणी शिरले होते. सामान्य कुटुंबीयांना याचा मोठा फटका सहन करावा लागला.  अनेक संसार उघड्यावरही आले आहेत. नांदेड महापालिकेने तात्पुरता निवारा केंद्र तयार करून या पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी ठेवले होते. आता पाणी उचलल्यानंतर पुन्हा ही कुटुंब आपल्या घरी परतले आहेत. त्यांना आता शासनाच्या निकषानुसार मदत दिली जाणार आहे.

केंद्र शासनाच्या नैसर्गिक आपत्ती निकषाच्या धर्तीवर पूरग्रस्त व्यक्तींना द्यावयाच्या मदतीचे दर निश्चित करण्यात आले आहेत. मदतीचे निकषही स्पष्ट आहेत. नांदेड शहरात झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांच्या अनुषंगाने शनिवारी नांदेडमध्ये महसूल विभाग आणि महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक शनिवारी पार पडली. यावेळी नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ नांदेड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, नांदेडचे तहसीलदार संजय वारकड, उपायुक्त नितीन गाढवे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. मिर्झा बेग यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

नांदेड शहरात २९ ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीने अनेक घरांमध्ये पाणी जाऊन संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. नांदेड शहरांमध्ये लो लाईन आणि नदी नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये घरामध्ये पावसाचे पाणी शिरून मोठे नुकसान झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर या नागरिकांना, या कुटुंबांना मदत व्हावी यासाठी नांदेड महसूल विभाग आणि महापालिकेच्या संयुक्त पथकाकडून नुकसानीचे पंचनामे केले जाणार आहेत. हे पंचनामे करताना अतिवृष्टीमुळे कपड्यांचे नुकसान, घरगुती भांडी, अन्नधान्याचे नुकसान इतकेच मर्यादित राहील. पंचनामा करत असताना मालमत्ता क्रमांक, घर क्रमांक, आधार कार्ड, बँकेचा तपशील आदींची माहिती घेतली जाणार आहे. बाधितांची यादी करताना दुबार नावे होणार नाही याची दक्षताही या पथकाकडून घेतली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दुसरीकडे ज्याप्रमाणे ‘ दुष्काळ आवडे सर्वांना” या म्हणीप्रमाणे नांदेड शहरातही ‘पूर आवडे काही जणांना’ अशी परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही संघटना आणि खाजगी व्यक्तींकडून पंचनामे करून आपले नाव पूरग्रस्तांच्या यादीत आणतो असे सांगून आर्थिक व्यवहारही सुरू केल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. याबाबत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या राज्य सचिव महादेवी मठपती यांनीही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्याकडे तक्रार नोंदवून अशा व्यक्ती आणि प्रवृत्तींना आळा घालण्याची मागणी केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी नांदेड शहरातील कोणत्याही पूरग्रस्ताने अशा आमिषांना बळी न पडता संघटना, खाजगी व्यक्ती यांच्याशी कोणताही आर्थिक व्यवहार करू नये, हे पंचनामे शासनाकडून संपूर्णतः मोफत होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पूर ओसरल्यानंतर दुसऱ्या दिवशी महसूल विभागाकडून हे पंचनामे केले जात आहेत. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या या तत्पर निर्णयाचे स्वागत होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!