प्रशासकीय

नांदेडमध्ये खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी पकडल्या विना क्रमांकाच्या दोन हायवा..!

नांदेड ग्रामीण पोलिसांसह आरटीओलाही केले पाचारण, क्रमांक लपवून केली जात होती वाहतूक, कौठा भागात मोदी ग्राउंडजवळ जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

नांदेड – जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने हैदोस घातलेला असताना ठोस कारवाई होत नसल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. प्रतिदिन कुठे ना कुठे हायवाने अपघात केल्याचे प्रकार उघडकीस येत असताना शुक्रवारी खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी विना क्रमांकाचे दोन हायवा पकडून कारवाईसाठी प्रादेशिक परिवहन विभाग आणि नांदेड ग्रामीण पोलिसांच्या हवाली केल्या आहेत. त्यामुळे आता या अवैध वाहतुकीविरुद्ध खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच रस्त्यावर उतरावे लागते की काय असेच चित्र निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाने चार ते पाच बळी घेतले आहेत. अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. यात प्रामुख्याने हायवाकडून वाहनधारकांचा बळी घेतला जात आहे. या हायवा चालक आणि मालकावर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या मोहीम राबविल्या जात असल्या तरी त्या प्रत्यक्ष कागदावरच असल्याचे गेल्या काही महिन्यातील अपघातावरून स्पष्ट होत आहे. पोलिसांकडून वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा पकडल्या जात आहेत; मात्र त्या हायवांना केवळ दोन हजार रुपये दंड भरून सोडले जात आहेत. त्यामुळे त्या पुन्हा लगेच रस्त्यावर धावत आहेत. या परिस्थितीत हायवाकडून होणारे अपघात रोखावे कसे? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्ह्यात प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस विभाग तसेच महसूल विभागाकडून अवैध वाळू वाहतूक तसेच इतर गौण खनिज वाहतुकीविरुद्ध होणारी कारवाई पाहता या हायवांना आळा घालणे अशक्यच वाटत होते.
त्यातच आता खुद्द जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुक्रवारी नवीन नांदेडातील मोदी ग्राउंडजवळ रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन विना क्रमांकाच्या हायवा पकडल्या आहेत. या हायवाचे क्रमांक मिटविण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. या हायवा जिल्हाधिकारी कर्डिले यांनी थांबवून थेट प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना पाचारण केले. त्याचवेळी नांदेड ग्रामीण पोलिसांनाही घटनास्थळी बोलवून या दोन विना क्रमांकाच्या हायवावर कारवाई करण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यामुळे आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांकडूनच रस्त्यावर उतरून कारवाई झाल्याने आता जिल्ह्यातील महसूल अधिकारी तसेच इतर विभाग काय करत आहेत असाच प्रश्न पुढे आला आहे.

जिल्ह्यात विना क्रमांकाचे हायवा यापुढे धावणार नाहीत, अशी तंबी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी दिली. त्याचवेळी महसूल विभागालाही अवैधरित्या होणारी गौण खनिजाची वाहतूकही थांबवावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. एवढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे खुद्द जिल्हाधिकारीच आता कारवाईसाठी रस्त्यावर उतरले असल्याने यापुढे तरी जिल्ह्यात हायवामुळे जाणारे बळी थांबतील अशी अपेक्षा नागरिक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!