
महापालिकेने मात्र या आंदोलनासंदर्भात थेट अमृत इंटरप्राईजेस या स्वच्छता ठेकेदारालाच जबाबदार धरले आहे. स्वच्छता कामगारांनी कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अनधिकृतरित्या शहरातील स्वच्छतेची सर्व कामे बंद केली आहेत. त्याचवेळी वारंवार अवलंबिण्यात आलेल्या काम बंद आंदोलनामुळे शहरातील नागरिकांना वेठीस धरल्या जात आहे. अस्वच्छतेमुळे रोगराई पसरून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ही बाब गंभीर असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. महापालिका आणि स्वच्छता ठेकेदारात झालेल्या करारातील अटीप्रमाणे सफाई कामगारांसह वाहनावरील कामगार व चालक हे संपात सहभागी होणे, दैनंदिन स्वच्छतेच्या कामात व्यत्यय निर्माण झाल्यास त्यास कंपनीच जबाबदार राहील, असे स्पष्टपणे नमूद आहे. त्यामुळे महापालिकेने ठेकेदाराला आदेश देताना या काम बंद आंदोलनाचा महापालिकेशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले काम बंद आंदोलनाच्या दिवशी त्वरित पर्यायी व्यवस्था करून शहर स्वच्छतेचे काम अखंडितपणे सुरू ठेवावे असे आदेश दिले आहेत. स्वच्छतेचे काम न झाल्यास कंपनीविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी दिला आहे.
सर्वच यंत्रणांना रहावे लागणार सतर्क..! कार्यरत कामगारांनी शनिवारी आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर महापालिकेने पर्यायी व्यवस्थेद्वारे ठेकेदाराला स्वच्छतेचे काम करण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यायी कामगार स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरल्यास त्यांना मूळ कामगाराकडून विरोध होण्याची शक्यता आहे. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही उद्भवू शकतो. या पार्श्वभूमीवर सर्वच यंत्रणांना सतर्क राहण्याची गरज आहे. महापालिका प्रशासन हा प्रश्न आता कसा हाताळेल याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न आता अटीतटीचा बनला आहे. शहरात सध्या वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. महोत्सवाचेही आयोजन करण्यात आले आहे. नांदेडमध्ये शनिवारपासून दोन दिवसीय विद्रोही साहित्य संमेलनही होणार आहे. या सर्व कार्यक्रमांसाठी जिल्ह्यासह राज्यातील कलाकार आणि रसिक नांदेडमध्ये दाखल झाले आहेत. त्यात मुस्लिम समाजातील पवित्र रमजान महिनाही सुरू आहे. अशा परिस्थितीत शहरातील स्वच्छता ठप्प होणे ही बाब महापालिकेच्या दृष्टीने निश्चितच चिंताजनक आहे.



