
नांदेड – नांदेडमध्ये महापौरांनी १०० दिवसांचा कृती आराखडा घोषित केल्याच्या दुसऱ्याच दिवशी शहर स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. शुक्रवारी शहरात एकाही भागात स्वच्छता झाली नाही. शहर स्वच्छतेचे काम पाहणाऱ्या अमृत कंपनीच्या ठेकेदाराने शंभरहून अधिक कामगारांना कामावरून काढल्याने आणि विविध मागण्या पूर्ण न केल्याने स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी थेट काम बंद आंदोलन केल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे जैसे थेच राहिले आहे. त्यामुळे महापौरांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यास पहिल्याच दिवशी खो बसला आहे.
महापौर कविता मुळे यांनी गुरुवारी भाजपाचे नेते माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत शहर विकासाचा १०० दिवसांचा कृती आराखडा घोषित केला आहे. या कृती आराखड्यात स्वच्छतेला प्रथम प्राधान्य असल्याचे महापौर कविता मुळे यांनी स्पष्ट केले होते. या कृती आराखड्यानंतर शहरात स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागेल अशी अपेक्षा होती; मात्र या अपेक्षेला पहिल्याच दिवशी अमृत कंपनीने ‘खो’ दिला आहे. कामगारांच्या मागण्या मान्य न केल्याने शुक्रवारी एकही कामगार स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरला नाही. या कामगारांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. कामगार युनियनच्या माध्यमातून हे आंदोलन केले जात आहे. अमृत कंपनीच्या शिवाजीनगर येथील वाहन तळावर हे कर्मचारी शुक्रवारी सकाळी एकत्रित झाले दुपारी बारा वाजता महापालिकेच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे कामगार युनियनचे अध्यक्ष गणेश शिंगे यांनी स्पष्ट केले आहे.
दुसरीकडे कामगार युनियनने या आंदोलनावर संदर्भात महापौरांसह महापालिका अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता मात्र त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही तोडगा ही निघाला नाही. त्यामुळे आज शुक्रवारपासून शहरात काम बंद आंदोलन करण्यात आले. गुरुवारी चर्चा झाली असती तर आंदोलन थांबवता आले असते मात्र त्यासाठी कोणीही पुढे आले नाही त्याचा फटका शहरवासीयना बसला आहे. शहरवासीयांना घाणीचा सामना करावा लागत आहे.
शहरवासीयांचे आरोग्य आले धोक्यात..! नांदेड शहरात शुक्रवारी एकाही भागात स्वच्छतेचे काम झाले नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसून आले. शहरातील अनेक भागात नियमित स्वच्छता होत नसल्याची ओरड सुरू असतानाच आज तर एकाही भागात काम झाले नाही. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी अमृत कंपनी खेळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आंदोलनाबाबत कंपनीच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असता याबाबत आमची कोणतीही जबाबदारी नसल्याचे स्पष्ट केले आहे. कामगारांच्या आंदोलनाशी आमचे काही देणे घेणे नसून महापालिका प्रशासनानेच हा प्रश्न सोडवावा अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे या कंपनीला देण्यात येणारे कोट्यावधी रुपये हे विना जबाबदारी दिले जात आहेत का हा प्रश्नही आता पुढे आला आहे. कामगारांचे प्रश्न सोडवण्याची भूमिका कंपनीने थेटपणे अमान्य केली आहे. शुक्रवारी दुपारी बारा वाजता महापालिका मुख्यालयासमोर कामगार धरणे आंदोलन करणार आहेत. त्यावेळी तरी कोणता तोडगा निघेल का हे पाहावे लागणार आहे.
.



