
नांदेड – संपूर्ण समाजमन, शिक्षण क्षेत्र आणि राज्याला हादरवून सोडणाऱ्या नांदेडमधील शिक्षक आत्महत्या प्रकरणात आता नांदेड पोलिसांनी तपासाला प्रारंभ केला आहे. या प्रकरणात आवश्यक ती कागदपत्र पोलीस विभागाला सोपविण्यात यावी यासाठी खुद्द इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे हे थेट नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात धडकले. या सर्व प्रकरणात शिक्षण विभागातील कारभार आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. आत्महत्या केलेल्या सुनील मोरे यांनी अनेकदा अर्जबाजारी करूनही सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केवळ जातीय भावनेतून या प्रकरणाकडे कानाडोळा करत ज्यांच्याविरोधात तक्रारी आहेत त्यांना सातत्याने पाठीशी घातले गेले असल्याची चर्चाही होत आहे. यामध्ये शिक्षण विभागातील कोणकोणते वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. या बाबीही पोलीस तपासात पुढे येणार आहेत.
नांदेडजवळील आमदुरा येथे शुक्रवारी सकाळी गोदावरी नदीत दोन मुलांसह आपली कार नदीत टाकून जिल्हा परिषद शाळेत शिक्षक असलेल्या सुनील नारायण मोरे यांनी आत्महत्या केली होती. या घटनेत पुढे मोरे यानेच आपल्या दोन्ही मुलांना नदीमध्ये कार टाकण्याआधीच जीव मारले असल्याची बाबही शवविच्छेदन अहवालानंतर पुढे आली आहे. एकूणच या घटनेने नांदेड जिल्हा हादरला होता. शिक्षक असलेल्या सुनील मोरे यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्यापही चर्चा सुरूच आहे. त्या दोन निष्पाप मुलांचा जीव त्याने का घेतला यावरही चर्चा सुरू आहे. या प्रकरणात सुनील मोरे याने ठेवलेल्या व्हाट्सअप स्टेटसनुसार मृत्यूस कारणीभूत असलेल्या हदगावचे तत्कालीन गटशिक्षणाधिकारी किशन फोले, विस्ताराधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहशिक्षक दत्ता विश्वंभर पवळे यांनी आपल्याला २०२३ पासून त्रास दिल्याचे नमूद केले होते. त्याच्या या व्हाट्सअप स्टेटसनुसार वडील नारायण मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गटशिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहशिक्षक दत्ता विश्वंभर पवळे या चौघाविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास इतवारा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे हे करत आहेत.
या तपासाच्या अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे आज सोमवारी सकाळीच नांदेड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात धडकले. त्यांनी या प्रकरणातील एकूणच आतापर्यंतचे तक्रारी अर्ज आणि जिल्हा परिषदेकडून केलेल्या कारवाई संदर्भातील कागदपत्रांची मागणी केली. हे कागदपत्र आतापर्यंत तरी जिल्हा परिषदेने पोलिसांना पुरवली नाहीत. घटनेच्या दिवशी १७ जुलै त्या प्रकरणातील संचिकेच्या धावत्या प्रवासाबद्दल समाज माध्यमांवर मोठी चर्चा झाली. त्याचवेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग सुट्टीच्या दिवशीही म्हणजेच शनिवार आणि रविवार ही पूर्ण क्षमतेने कार्यात मग्न होता ही बाबही पुढे आली आहे. त्यामुळे आता एकूणच शिक्षण विभागाची ही तत्परता नेमकी कोणत्या कामासाठी सुरू होती ही बाबही आता संशोधनाची झाली आहे.
नांदेड ग्रामीण पोलिसांचाही तपास सुरू..! शिक्षक सुनील मोरे आत्महत्या प्रकरणात दोन गुन्हे दाखल झाले आहेत. सुनील मोरे या शिक्षकाने अत्यंत क्रूरतेने आपल्या दोन्ही मुलांचा आत्महत्येपूर्वी खून केला होता. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा मोरेविरुद्ध दाखल झाला आहे. हा तपास नांदेड ग्रामीण ठाण्याचे सिंघम पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्यामुळे खुनाच्या दिशेने होणाऱ्या तपासातही नेमक्या कोणकोणत्या बाबी पुढे येतील? कोण कोण पोलिसांच्या हाती लागतील याकडेही लक्ष लागले आहे. ॲट्रॉसिटी दाखल असलेले चारही अधिकारी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. त्यामध्ये तत्कालीन गटशिक्षणाधिकारी किशन फोले विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहशिक्षक दत्ता पवळेचा समावेश आहे.



