Police

नांदेडमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यातून अनेक बडे अधिकारी निसटले..?

लोहा प्रकरणातील तक्रारदाराची थेट अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीशाकडे शपथपत्राद्वारे धाव

नांदेड – लोहा येथे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत मुख्य आरोपी सोडून दुसऱ्यावरच कारवाई करण्यात आल्याचा आरोप या प्रकरणातील तक्रारकर्त्याने कंधार येथील अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायाधीशांकडे एका शपथपत्राद्वारे केला आहे. मुख्य आरोपीला बाजूला काढण्यासाठी विभागातील अधिकाऱ्यांनीच कामगिरी बजावल्याचा खळबळजनक आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचे गूढ नेमके काय? असा प्रश्न पुढे आला आहे. गेल्या काही दिवसातील कारवाया पाहता त्या कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यातून निसटले असल्याचेच स्पष्ट होत आहे.

लोहा येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:१४ ते १०:३१ वाजताच्या सुमारास तक्रारदाराकडून अर्जित रजा मंजूर करून देण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच पंचायत समक्ष स्वीकारल्यावरून केंद्रप्रमुख तथा लोहा तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात नियुक्तीवर असलेले दिगंबर रामचंद्र शिंदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास प्रारंभी लाच लचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस निरीक्षक अर्चना करपुडे यांच्याकडे दिला होता; मात्र पुढे तपास अधिकारी बदलण्यात आले. या प्रकरणातील तपास अधिकारी का बदलण्यात आले हा प्रश्नही तक्रारदाराने उपस्थित केला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोणत्याही कारवाईनंतर ते कार्यालय सील केले जाते; मात्र लोहा येथील कारवाईनंतर गटशिक्षणाधिकारी कार्यालय सील करण्यात आले नाही.

तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयात तीन वेळा स्वतः भेट देऊन लोह्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश  व्यवहारे आणि दिगंबर रामचंद्र शिंदे यांनी अर्जित रजा मान्य करण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार लेखी आणि तोंडी स्वरूपात दोन महिन्यापूर्वी दिली होती. सदरील तक्रार विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार यांच्याकडे दिली होती; मात्र या प्रकरणात प्रारंभी कार्यालयाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे. याच प्रकरणात पुन्हा लेखी आणि तोंडी तक्रार करण्यात आली. त्यानंतर पोलीस निरीक्षक अनिता चव्हाण यांची सदरील गुन्ह्यात सापळा रचण्याकरिता अधिकारी म्हणून नेमणूक केली; परंतु या प्रकरणात मूळ तक्रार लोह्याचे गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांच्याविरुद्ध असताना त्यांना वाचवून दिगंबर शिंदे यांच्यावर सापळा रचून त्यांना अटक केली. मात्र गटशिक्षणाधिकारी व्यवहारे यांना मोकाट सोडल्याचेही तक्रारदाराचे म्हणणे आहे.

प्रारंभीच्या सापळा कार्यवाहीमध्ये पोलीस निरीक्षक प्रीती जाधव आणि पोलीस निरीक्षक पठाण हे कार्यवाहीदरम्यान लोहा येथे आले होते. यावेळी सापळा कार्यवाही दरम्यान व्यवहारे यांची पडताळणी पोलीस उपाधीक्षक प्रशांत पवार यांनी एकाच वेळी केली. पुन्हा एकदा पडताळणी करण्याची मागणी तक्रारदाराकडून करण्यात आली. त्यावेळी व्यवहारे यांना जाऊ द्या शिंदेवर कारवाई करू’ असे म्हटल्याने पुन्हा एकदा या प्रकरणात संशय निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे. लाच मागणी पडताळणी अथवा लाच स्वीकारण्यासंदर्भात सदरील विभागाकडून अनेकदा पडताळणी केली जाते. विशेषत: पोलीस विभागाच्या एखाद्या सापळ्यात आठ ते दहा वेळा पडताळणी होत असते; मात्र या कारवाईत एकदाच पडताळणी करून केवळ मध्यस्थावरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदाराने १७ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाचे अधीक्षक संदीप पालवे यांना भेटून गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांना आरोपी का केले नाही यासंबंधी लेखी अर्ज दिला आहे. या प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालयातील दोन अधिकारी तसेच जिल्हा परिषदेतील वित्त विभागातील एक मोठा अधिकारी, शिक्षण विभागातील एक उपशिक्षणाधिकारी यांचे कॉल रेकॉर्ड व्हाट्सअप तपासणी करावी अशी मागणी केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी करण्यात आलेल्या दिगंबर शिंदे यांची तीन दिवस पोलीस कोठडी घेतल्यामुळे चक्क तपास अधिकारीच बदलण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रीती जाधव यांच्याकडे सोपवण्यात आला. त्या तपासाचे गांभीर्य न ठेवता देव दर्शनासाठी गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

एकूणच लोहा येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत मध्यस्थ दिगंबर शिंदे यांना अटक केली मात्र तक्रारीतील मूळ तक्रार असणाऱ्या गटशिक्षणाधिकाऱ्याविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या गेल्या काही दिवसातील कारवाई पाहता त्यामध्ये वरिष्ठ अधिकारी हे अलगदपणे बाजूला पडले असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामध्ये कुंडलवाडी, हदगाव, मरखेल, सोनखेड, उस्माननगर, हदगाव, रामतीर्थ आदी ठिकाणी असे प्रकार जाणीवपूर्क घडले की काय अशी चर्चाही सुरू आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!