शैक्षणिक

इयत्ता बारावी परीक्षेत नांदेड जिल्ह्याचा ७७.७० टक्के निकाल

गतवर्षीच्या तुलनेत १५ टक्के निकाल घसरला, यंदाही निकालात मुलीच अव्वल, जिल्ह्यात अर्धापूर तालुक्याचा सर्वाधिक ९४ टक्के तर कंधार तालुक्याचा सर्वात कमी ६३.१६ टक्के निकाल

नांदेड – इयत्ता बारावीचा ऑनलाईन निकाल आज घोषित करण्यात आला आहे. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा एकूण ७७.७० टक्के निकाल लागला आहे. यामध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ८४.६१ टक्के तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण ७१.७४ टक्के इतके आहे. यंदाही बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली आहे. गतवर्षीच्या तुलनेत नांदेड जिल्ह्याचा निकाल १५ टक्क्यांनी घसरला आहे.

नांदेड जिल्ह्यातील एकूण ४० हजार ५२३ विद्यार्थी फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता १२ वी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. त्यातील ३१ हजार ४८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्यात ४१ हजार ६० विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यातील ४० हजार ५२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये मुलांची संख्या २१ हजार ७४३ तर मुलींची संख्या १८ हजार ७८० इतकी होती. यात १५ हजार ८९० मुली बारावी परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत तर १५ हजार ५९९ मुले उत्तीर्ण झाले आहेत. नांदेड जिल्ह्यात यांना बारावी परीक्षेत विज्ञान शाखेचा ८८.८२ टक्के, वाणिज्य शाखेचा ७०.६४ टक्के, वोकेशनल ६६.७४ टक्के आणि कला शाखेचा ६०.११ टक्के निकाल लागला आहे.

नांदेड जिल्ह्याचा तालुका निहाय निकाल लक्षात घेतला तर सर्वाधिक ९४ टक्के निकाल हा अर्धापूर तालुक्याचा लागला आहे. सर्वात कमी ६३.१६ टक्के निकाल कंधार तालुक्याचा लागला आहे. नांदेड तालुक्याचा ८३.७१ टक्के, भोकर ८२.२८, बिलोली ८८.९४, देगलूर ६३.६२, धर्माबाद ७८.६३, हदगाव ७२.९५, हिमायतनगर ७८.६४, किनवट ७९.५०, लोहा ६५.२६, माहूर ७५.०२, मुखेड ८२.७२, मुदखेड ९१.४२, नायगाव ७७.७५ टक्के आणि उमरी तालुक्याचा ८६.६८ टक्के निकाल लागला आहे.

  • कॉपीमुक्ती मोहिमेला आले यश.. निकालात झाली घसरण…बारावी परीक्षेत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली कॉपीमुक्ती मोहीम राबविण्यात आले. या मोहिमेला यश आल्याचे निकालावरून स्पष्ट झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत नांदेड जिल्ह्याचा निकाल १४.९४ टक्क्यांनी घसरला आहे. बारावीचा गतवर्षी ९२.६४ टक्क्यांवर असलेला निकाल यंदा ७७.७० टक्क्यांवर आला आहे. कॉपीमुक्ती मोहिमेत वेबकास्टिंगसह सर्व केंद्रावर सीसीटीव्ही, बैठे पथक, विशेष भरारी पथक या माध्यमातून कॉपी रोखण्यात आली होती.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!