राजकीय

मी पॉझिटिव्ह राजकारण करणारा माणूस – खा. अशोकराव चव्हाण 

लोकच ठरवतील कोण खलनायक अन् कोण नायक 

नांदेड – राजकारण करत असताना आपण कधीही खलनायकाची भूमिका घेतली नाही. मी पॉझिटिव्ह राजकारण करणारा माणूस आहे, आगामी काळात कोण खलनायक अन् कोण नायक हे लोकांनीच ठरवावे अशी स्पष्ट भूमिका माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आज बुधवारी नांदेडमध्ये मांडली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अशोकराव चव्हाण हे राजकारणातील सेटींगबाज असल्याचा आरोप काल २३ एप्रिल रोजी नांदेडमध्येच केला होता. या आरोपाला त्यांनी २४ एप्रिल रोजी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिले. नाना पटोले यांनी अशोकराव चव्हाण हे राजकारणात नेहमीच सेटिंग करतात अशी टीका केली होती. यावर बोलताना चव्हाण यांनी आपण राजकारणात कधीही सेटिंग केली नसल्याचे सांगितले.  २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यात सर्व नऊच्या नऊ जागा निवडून आणल्या.  २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ७२ जागा आणल्या होत्या. त्यावेळी मी सेटिंग केली असती तर इतर पक्षांनाही निवडून आणले असते. सध्या राजकीय शिमगा सुरू असून नाना पटोले यांनी काँग्रेसमधून भाजपा, भाजपामधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला यात कोणती सेटिंग होती असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

आपल्या कारखान्याला १५० कोटींचे कर्ज देण्याबाबत विरोधक चर्चा करत आहेत. यावर चव्हाण म्हणाले, हे अनुदान नाही तर व्याजासकट कर्ज फेडायचे आहे. त्यामुळे योग्य त्या निकषावरच हे कर्ज मिळाले आहे. सहकारी तत्त्वावर चांगल्या प्रकारे हा कारखाना चालत आहे.

केंद्रीय यंत्रणांच्या भीतीपोटी आपण भाजपात गेल्याचा विरोधक प्रचार करत आहेत. मात्र आपल्यावर ईडीची कोणतीही चौकशी प्रलंबित नाही. भाजपाच्या कार्यकाळात आपल्यावर कोणताही खटला दाखल नाही. आदर्श प्रकरणातही उच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे आदर्श प्रकरणाला आता १४ वर्षे उलटले आहेत. या काळात तीन निवडणुका झाल्या आहेत. लोकसभेत मी स्वतः निवडून आलो. विधानसभेतही घवघवीत यश मिळवले होते. त्यामुळे हा विषय कालबाह्य झाल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

नरसी येथील सभेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी ‘नांदेड का मौसम बिगड गया है’ असे वक्तव्य केले होते. हे त्या दिवशीच्या हवामानाबद्दल वक्तव्य होते. त्या दिवशी सभेदरम्यान पाऊस सुरू असताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. मात्र सध्या नांदेडचे राजकीय मौसम अच्छा आहे अशी टिप्पणीही त्यांनी केली.

भारतीय संविधान बदलाबाबतही जाणीवपूर्वक अपप्रचार केला जात आहे. मात्र संविधान हे कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही. संविधानाच्या मूळ गाभ्याला बदलू शकत नाही, हा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच दिला आहे. त्यामुळे संविधान बदलाच्या या चर्चा अपप्रचार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षणाबाबत आपली स्पष्ट भूमिका असून राज्य सरकारने दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला दिले आहे. सगे सोयऱ्यांचा विषयही आचारसंहितेनंतर मार्गी लागणार आहे.  मराठा आरक्षण आंदोलनकर्ते  मनोज जरांगे पाटील यांच्याशी मी चर्चा केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जो काही पाठपुरावा करायचा आहे तो मी सरकारकडे करेल असेही त्यांना सांगितले आहे. महादेव पिंपळगाव येथील घटनेप्रकरणी आपला कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी स्वतः पुढाकार घेऊन काही लोकांना प्रतिबंधित करण्याची कारवाई केली आहे. निवडणूक काळात कोणालाही प्रचारापासून रोखता येणार नाही, हे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे ही कारवाई प्रशासनाकडून झाली आहे.

लोकसभा निवडणुकीत नांदेडकर हे विकासाच्या अजेंड्याला मतदान करतील असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेत विकसित महाराष्ट्र, विकसित मराठवाडा, विकसित नांदेडही असावे याच भावनेतून आपण भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आगामी काळात मराठवाड्याच्या, नांदेडच्या विकासासाठी लोकसभा निवडणुकीत प्रतापराव पाटील चिखलीकर यांना निवडून द्यावे असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेत डॉ. अजित गोपछडे, प्रवीण साले, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, बाळू खोमणे आदींची उपस्थिती होती.

पंतप्रधानांकडून केलेला उल्लेख अभिमानास्पदच…पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नांदेड येथील सभेत शंकरराव चव्हाण यांचा उल्लेख केला होता. पंतप्रधानांनी शंकररावांचा उल्लेख करणे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे अशोकराव चव्हाण म्हणाले. शंकरराव चव्हाण आणि मोदींची ओळख होतीच. त्यांच्या चर्चाही झाल्या होत्या. या बाबीचा पंतप्रधान मोदींनी जाहीर उल्लेख करणे ही नांदेडसाठी गौरवाची बाब असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!