
किरण मुधोळकर
नांदेड – देगलूर तालुक्यातील नांदेड – देगलूर रस्त्यावर बागनटाकळी येथे एका वळणावर दोन चालकांना समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने या दोन बस समोरासमोर धडकल्याची घटना बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. पावसामुळे दोन्ही बस चालकांना अंदाज आला नाही. त्यात हा अपघात घडला. या अपघातात पाच जण जखमी झाले आहेत.
देगलूर आगाराची देगलूर – बिलोली ही बस प्रवासी घेऊन जात असताना अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. देगलूर तालुक्यातील बागनटाकळी येथे एका वळणावर समोरून येणाऱ्या बसचा अंदाज आला नाही. तसेच कर्नाटक आगाराच्या चालकालाही पावसामुळे पुढील बसचा अंदाज लागला नाही. यात दोन्ही बस समोरासमोर धडकल्या. या धडकेत महाराष्ट्र बसमधील तीन प्रवासी जखमी झाले आहेत. त्यासोबतच वाहक आणि चालक यांनाही मार लागला आहे. या सर्वांना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर मोठी गर्दी येथे झाली होती. काही वेळाने पोलिसांनी ती गर्दी दूर करून या मार्गावरील वाहतूक सुरळीत केली.