हवामान

नांदेड जिल्ह्यात २५ महसूल मंडळात एकाच दिवशी १०० मिलिमीटरहून अधिक पाऊस, एकूण ४५ मंडळात अतिवृष्टी 

विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडले, गोदावरी नदी धोक्याच्या पातळीवर 

नांदेड – जिल्ह्यात पावसाचा तिसरा दिवस असून सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे. रविवारी जिल्ह्यातील २६ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली होती तर सोमवारी ४५ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये तब्बल २५ महसूल मंडळात एकाच दिवशी १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र पूर परिस्थिती उद्भवली आहे. इतर जिल्ह्यातील धरणातून होणाऱ्या विसर्गावरही प्रशासकीय यंत्रणा समन्वय ठेवून असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. जिल्ह्यात आजघडीला सरासरीच्या ८३.३४ टक्के पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत ७४२.८० मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात सरासरी ८९१.३० मिमी एकूण पाऊस होतो.

जिल्ह्यात शनिवारपासून पावसाला प्रारंभ झाला. रविवारी दिवसभर तसेच रात्रीही पाऊस झाला तर आज सोमवारी पावसाच्या सरी कोसळत आहेत. जिल्ह्यातील सर्व धरणे आता तुडुंब भरली आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. नांदेड जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील धरणातील पाण्याचा विसर्ग येत असल्याने पूर परिस्थिती गंभीर झाली आहे. सातत्याने होत असलेल्या पावसाने जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पाण्यामुळे अनेक तालुक्यातील पिके खरडून गेली आहेत तर दुसरीकडे शेतात पाणी साचल्यानेही पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पशुधनाचेही मोठे नुकसान झाले आहे. तीन दिवसात २५ जनावरांचा पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. किनवट तालुक्यात पाच ठिकाणी, उमरी दोन, हदगाव आठ, धर्माबाद एक, अर्धापूर एक, लोहा तीन, हिमायतनगर दोन, माहूर दोन आणि भोकर तालुक्यात एका पशुधनाची हानी झाली आहे.

 

अर्धापूर मंडळात एकाच दिवशी सर्वाधिक १७०.५० मिमी पाऊस…जिल्ह्यात सोमवारी झालेल्या ४५ महसूल मंडळातील अतिवृष्टीमध्ये २५ महसूल मंडळात एकाच दिवशी १०० पेक्षा अधिक मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यामध्ये सर्वाधिक अर्धापुर तालुक्यातील अर्धापूर महसूल मंडळ १७०.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल लोहा तालुक्यातील लोहा मंडळात १५७.२५, सोनखेड मंडळात १५७.२५, कलंबर १५७.२५, नांदेड तालुक्यातील लिंबगाव महसूल मंडळात १५४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नांदेड तालुक्यातील नऊ महसूल मंडळात १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. त्यामध्ये नांदेड शहरात ११८ मिमी, नांदेड ग्रामीण १२४.७५, तुप्पा १२५, वसरणी १०३.७५, विष्णुपुरी ११२.५०, तरोडा १४८.७५, वाजेगाव १३५ आणि नाळेश्वर महसूल मंडळात ११२.२५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मुखेड तालुक्यातील बारहाळी महसूल मंडळात १०२.५०, मूक्रमाबाद ९९.५०, लोहा तालुक्यातील माळाकोळी १०१.५०, शेवडी ११४.५०, हदगाव तालुक्यातील मनाठा मंडळात ११२.२५, तामसा मंडळात १३२.५०, पिंपरखेड १०२.२५ मिमी, मुदखेड तालुक्यातील मुदखेड मंडळात १२९.५०, मुगट १२५.२५, बारद १३७, अर्धापूर तालुक्यातील दाभड मंडळात १२६.५० आणि मालेगाव मंडळात १३५.७५ मिलिमटर पावसाची नोंद झाली आहे. यासह जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बिलोली, आदमपूर, लोहगाव, मुखेड तालुक्यातील जांब, अंबुलगा, कंधार तालुक्यातील कुरुळा, दिग्रस, लोहा तालुक्यातील कापसी, हदगाव तालुक्यातील हदगाव, तळणी, आष्टी, भोकर तालुक्यातील भोकर, देगलूर तालुक्यातील मरखेल, मालेगाव, हाणेगाव, नरंगल बु. हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव, नायगाव तालुक्यातील कुंटूर, नरसी आणि मांजरम महसूल मंडळातही अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!