
नांदेड :- जिल्ह्यात श्री गणेशोत्सवादरम्यान १९ सप्टेंबरपर्यंत डॉल्बी सिस्टीम मालक, चालक, इतर कोणत्याही व्यक्तीस डॉल्बी सिस्टीम वापरण्यास, चालविण्यास भारतीय सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ नुसार जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढला आहे. इतकेच नव्हे तर डॉल्बी सिस्टीम थेट सीलबंद स्थितीत ठेवावी असे निर्देशही दिले आहेत.
जिल्हादंडाधिकारी अभिजीत राऊत यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार श्रींची स्थापना ते १९ सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत नांदेड जिल्ह्यात कोणत्याही डॉल्बी मालक, चालक, गणेश मंडळाचे पदाधिकारी यांनी त्यांचे कब्जातील डॉल्बी सिस्टीम वापरात उपयोगात आणण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या डॉल्बी मशीन व यंत्रसामुग्री संबंधितांनी स्वत:चे कब्जात सिलबंद स्थितीत ठेवावी. हा आदेश ७ सप्टेंबर रोजीच्या मध्यरात्रीपासून ते १९ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणेश मूर्तींचे विसर्जन होईपर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहील.
डॉल्बीचे आवाजामुळे व कंपनामुळे लहान मुले, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला तसेच आजारी व सामान्य नागरीक यांच्या कानास, हृदयास, आरोग्यास, जिवितास धोका होण्याची तसेच सामाजिक स्वास्थ बिघडण्यास व मालमत्तेस हानी पोहचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सार्वजनिक शांतता व सुरक्षिततेस बाधा उत्पन्न होण्याची शक्यता असल्याने गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डॉल्बी मालक, चालक यांचेवर बंदी घालण्यात आली आहे. असेही आदेशात नमूद केले आहे.