
नांदेड – नांदेड जिल्ह्यातील १० नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडल्यानंतर नांदेड जिल्हा पोलीस दल आणि प्रशासकीय यंत्रणेला आता १८ दिवस स्ट्रॉंग रूमचा सांभाळ करावा लागणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पाडल्यानंतर पुन्हा १८ दिवसांचे हे आव्हान पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेवरही राहणार आहे. त्याचवेळी या काळात होणाऱ्या वेगवेगळ्या आरोपांनाही प्रशासनासह पोलिसांनाही तोंड द्यावे लागेल, ही बाबही वेगळीच. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयानंतर ३ डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी ही आता २१ डिसेंबर रोजी होणार आहे.
नांदेड जिल्ह्यात २ डिसेंबर रोजी २९१ मतदान केंद्रावर नगराध्यक्ष पदाच्या ७१ तर नगरसेवक पदाच्या ८७३ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झाले. जिल्ह्यातील उमरी, हदगाव, मुदखेड, देगलूर, किनवट, बिलोली, भोकर, कुंडलवाडी, लोहा, कंधार या नगर परिषदांची तर हिमायतनगर नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया पार पडली. या प्रक्रियेत सरासरी ७५ टक्के मतदान झाले आहे. १२१ प्रभागांसाठी झालेल्या या निवडणुकीत मंगळवारी मतदान पार पडले. प्रशासकीय यंत्रणा आणि पोलीस दलाच्या योग्य नियोजनामुळे मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी मंगळवारी जिल्ह्यातील वेगवेगळ्या मतदान केंद्रांना भेटी मतदान प्रक्रिया आणि सुरक्षा व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. त्याचवेळी पंधरा दिवसापासून या दोन्ही अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रापर्यंत जात मतदान आणि बंदोबस्ताची तयारी केली होती. तीच तयारी २ डिसेंबर रोजी प्रत्यक्षात उतरली आणि मतदान शांततेत व सुरळीत पार पडले.
नांदेड जिल्ह्यात भोकर, लोहा, मुदखेड, कंधार, उमरी, हदगाव, बिलोली आदी नगर परिषदेच्या मतदान प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष होते. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या नगर परिषदेची निवडणूक लक्षवेधी ठरली आहे. त्यामुळे मतदानादरम्यान काही अनुचित प्रकार होईल की काय अशी शक्यता व्यक्त केली जात होती; मात्र नांदेड जिल्हा पोलीस दलाच्या योग्य नियोजनामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत प्रारंभीच्या टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या निवडणूक निकालाचा परिणाम आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकावरही होणार आहे. त्यामुळे या निवडणूक निकालाने जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वही सिद्ध होणार आहे. माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण, खा. प्रा. रवींद्र चव्हाण, खा. नागेश पाटील आष्टीकर, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. हेमंत पाटील, आ. बाबुराव पाटील कोहळीकर, आ. भीमराव केराम, आ. राजेश पवार आदी नेत्यांच्या राजकीय वर्चस्वाची ही लढाई ठरणार आहे.
स्ट्रॉंग रूममध्ये द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था राहणार – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार… जिल्ह्यातील दहा नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीची मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. या मतदानानंतर सर्व ईव्हीएम मशीन आता त्या त्या ठिकाणी स्ट्रॉंग रूममध्ये आणण्यात आल्या आहेत. या मशीन २० डिसेंबरपर्यंत आता सुरक्षित ठेवणे ही पोलिसांची तसेच प्रशासकीय यंत्रणेची जबाबदारी आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत सांगितले, या प्रत्येक स्ट्रॉंग रूममध्ये द्विस्तरीय सुरक्षा व्यवस्था राहणार आहे. स्ट्रॉंग रूममध्ये आतील सुरक्षेची जबाबदारी ही राज्य राखीव दलाच्या जवानांची राहील तर स्ट्राँग रूमच्या बाहेरील सुरक्षा व्यवस्था ही जिल्हा पोलीस दलाकडून सांभाळली जाणार आहे. सीसीटीव्हीच्या नजरेखाली या सर्व स्ट्रॉंग रूम राहणार आहेत. स्ट्रॉंग रूमबाबत जिल्हा प्रशासन तसेच निवडणूक आयोगाकडून दिलेल्या जाणाऱ्या सूचनांचेही निश्चितपणे पालन केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



