क्राईम

नांदेड शहरात आणखी एका हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

अंबेकर नगरातील नरंगले बॉईज हॉस्टेलमधील घटना, दहावीतील विद्यार्थ्याने घेतला गळफास

नांदेड – संपूर्ण महाराष्ट्रात शैक्षणिक हब म्हणून उदयास आलेल्या नांदेडमध्ये हॉस्टेलचे मोठ्या प्रमाणात पीक आले आहे. हॉस्टेलमधील सुविधा, सुरक्षितता या बाबी या ना त्या कारणामुळे पुढे येत आहेत. शहरातील अंबेकर नगरातील नरंगले बॉईज हॉस्टेलमध्ये एका दहावीतील विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली.  शहरातील अन्य एका हॉस्टेलमध्ये काही दिवसापूर्वीच एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना विस्मरणात जात असतानाच नरंगले बॉईज हॉस्टेलमध्ये आत्महत्येची ही घटना घडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवरील  ताण नेमका कशाचा आहे याचा आता तपास पोलिसासह समाजव्यवस्थेलाही करावा लागणार आहे.

हदगाव तालुक्यातील चिकाळा येथील गंगाधर बजरंग माने (वय १५) हा दहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी शहरातील अंबेकर नगरातील नरंगले बॉईज हॉस्टेलमध्ये गेल्या काही दिवसापासून राहत होता. २० ऑगस्ट रोजी त्याने सायंकाळच्या सुमारास होस्टेलमध्ये आपल्या रूममध्ये केबलने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविली. या आत्महत्येचे नेमके कारण अद्यापही अस्पष्टच आहे. त्याचे रूम पार्टनर हे बाहेर होते. बाहेरून आल्यानंतर  गंगाधर माने याने गळफास घेतल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने हॉटेल व्यवस्थापकाला सदर घटना सांगितली. हॉस्टेल व्यवस्थापकांनी या प्रकरणाची माहिती पोलिसांना कळवली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले. विमानतळ ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जोंधळे, पोलीस उपनिरीक्षक साखरे, साने आणि एएसआय सदाशिव आढाव यांनी घटनास्थळाला भेट दिली. पंचनामा करून मृतदेह खाली उतरविण्यात आला.याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

विशेष म्हणजे मयत विद्यार्थ्याच्या वडिलांनी पाच वर्षांपूर्वी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले आहे. आता गंगाधरनेही त्याच पद्धतीने आत्महत्या केल्याने माने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या आत्महत्येचे नेमके कारण काय याचा तपास आता पोलिसांना करावा लागणार आहे. विद्यार्थ्यावर असलेला शैक्षणिक ताण की शहरात होत असलेली मानसिक ओढाताण किंवा इतर बाबी या आत्महत्येस कारणीभूत आहेत काय? याबाबतही आता शोध घ्यावा लागणार आहे. त्याचवेळी नांदेड शहरामध्ये असलेल्या हॉस्टेलमधील सोयी सुविधा यासह एकूणच वातावरण याबाबतही आता प्रशासनाला माग काढावा लागणार आहे. विशेष म्हणजे अशा खाजगी हॉस्टेलची कोणतीही नोंद शासन दप्तरी नाही हेही विशेष. विद्यार्थ्यांच्या होत असलेल्या या आत्महत्या रोखण्यासाठी  तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे अन्यथा अशा आत्महत्यांच्या संख्येत वाढच होत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!