
नांदेड- शहरातील शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ आणि नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या पाच गुन्ह्यांमधील तसेच एक मोटार सायकल आणि २० मोबाईल चोरीचे गुन्हे नांदेड ग्रामीण पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकाला अटक केली आहे.
ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी पोलीस ठाणे अधिकाऱ्यांना चोरी आणि घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांनी १० जुलै रोजी मिळालेल्या माहितीनुसार दिवेश मारुती कदम याला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ असलेली दुचाकी चोरीची असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर त्याची पोलिसांनी आणखी सखोल चौकशी केली त्यात दिवेश कदम आणि त्याच्या इतर साथीदारांनी नांदेड ग्रामीण ठाणे, भाग्यनगर, शिवाजीनगर, विमानतळ ठाणे हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी चोरी आणि घरफोडी केल्याचे कबूल केले. दिवेशने दिलेल्या माहितीनुसार या चौघांनी नांदेड ते हैदराबाद जाणाऱ्या आणि येणाऱ्या वेगवेगळ्या ट्रेनमधून वेगवेगळ्या स्टेशनवर तसेच नांदेड शहरातील रेल्वेस्टेशन, बसस्टॅन्ड, श्रीनगर, मालेगाव रोड, गोकुळनगर तसेच ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतूनही विविध भागात अनेक मोबाईल चोरल्याचे सांगितले. या आरोपींची घरझडती घेतली असता त्यांच्या घरातून रोख १५ हजार ८०० रुपयांसह एक दुचाकी, सोन्या-चांदीचे दागिने तसेच २० वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल असा एकूण ३ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी दिवेश कदम वय २४, रा. गौतमीनगर, बळीरामपूर याला अटक केली असून संदीप पवार वय २३, रा. राजनगर पावडेवाडी नाका, सुरज उर्फ बिच्चू वय २८ रा. राजनगर, पावडेवाडी नाका आणि सुनील उर्फ काळया वय २७ वर्षे रा. राजनगर पावडेवाडी नाका नांदेड या तिघांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक बाबुराव चव्हाण, सहायक पोलीस उपनिरीक्षक वाकडे, पोहेकॉ कऱ्हाळे, भिसे, पोकॉ माळगे, सरमलवार, गायकवाड, कदम, शिरगिरे, पोकॉ शेख यांनी केली आहे.
नांदेड ग्रामीण पोलिसांची घोडदौड सुरूच..! जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाणे अधिकारी आणि स्थानिक गुन्हा शाखेकडून वेगवेगळे गुन्हे उघडकीस आणले जात आहेत. त्यामध्ये गेल्या काही दिवसापासून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याची गुन्हे उघडकीस आणण्याची घोडदौड सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या खुर्चीत आता बदल होईल अशी चर्चा सुरू आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळ्या ठाणेदारांकडून गुन्हे उघडकीस आणण्याच्या कामगिरीची चमक दाखवली जात आहे. नांदेड शहरातील भाग्यनगर पोलीसांकडूनही काही मोठे गुन्हे उघडकीस आणले आहेत. पण या सर्व तपासामध्ये ग्रामीण पोलिसांची कामगिरी अव्वल ठरत आहे. ग्रामीण ठाण्याच्या या कामगिरीला पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनीही नुकत्याच झालेल्या एक पत्रकार परिषदेत गौरविले आहे. त्यामुळे आगामी काळात काहीतरी नवीन बदल दिसतील अशीही चर्चा सुरू आहे. त्यामुळे हे बदल, खांदेपालट होतील का याकडेही नांदेडकरांचे लक्ष लागले आहे.



