राजकीय

नांदेडमध्ये भाजपा आमदारांना मतदारांचा दे धक्का..!

भोकरच्या आ.श्रीजया चव्हाण पदार्पणातच ठरल्या यशस्वी, मतदारसंघातील दोन्ही नगरपरिषदावर मिळविला एकहाती विजय, खा. चव्हाणांनी टोचले आमदारांचे कान..!

नांदेड – नांदेड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या आमदारांना आपल्याच मतदारसंघातील नगर परिषदा राखण्यात यश मिळवता आले नाही. किनवट, देगलूर, नायगाव या मतदार संघात भाजपाचे आमदार असताना तेथे सत्ता आली नाही. त्याचवेळी मुखेडमध्ये भाजपाचे १२ नगरसेवक निवडून आले असले तरीही नगराध्यक्ष पद मात्र शिवसेना शिंदे गटाकडे गेले आहे. बिलोलीतील स्थानिक विकास आघाडी ही भाजपचीच असल्याचे आता खुद्द खासदार चव्हाण यांनीच स्पष्ट केल्याने देगलूरचे आ. जितेश अंतापूरकर यांना काही अंशी का होईना दिलासा मिळाला आहे. त्याचवेळी भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी पदार्पणातच आपल्या मतदारसंघातील दोन्ही परंपरागत गड राखले आहेत.

देगलूर हा एकेकाळी भाजपाचा गड मानला जात होता. यावेळीही माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण आणि भाजपचे दुसरे खासदार डॉ. अजित गोपछडे यांच्या उपस्थितीत पहिली प्रचार सभा देगलूरला घेण्यात आली. त्यानंतर उमेदवारी दाखल करण्याच्या दोन दिवस अगोदर भाजपाने आपले उमेदवार दिले. ते उमेदवारही सक्षम नसल्याचेच निकालानंतर दिसून आले. विशेष म्हणजे येथे भाजपाने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर एकही मोठी सभा घेतली नाही. त्यामुळे उमेदवार स्वतःच्याच बळावर जेमतेम लढले. स्थानिकचे आमदार जितेश अंतापूरकर असून नसल्यासारखेच या निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे २७ पैकी एकाही जागेवर भाजपाला देगलूर नगर परिषदेत खातेही उघडता आले नाही. येथे राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. भाजपातून राष्ट्रवादीमध्ये आणि पुन्हा राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले रामदास सुमठाणकर यांनी काँग्रेसच्या विजयासाठी मोठे प्रयत्न केले. त्यात त्यांना मोठा विजय मिळाला असला तरीही सत्तेपर्यंत पोहोचता आले नाही. काँग्रेसचे येथे १२ नगरसेवक निवडून आले आहेत.

उमरी नगरपालिकेतही राष्ट्रवादी काँग्रेसने एकहाती विजय प्राप्त केला आहे. उमरीत गोरठेकर घराण्याचा दबदबा आजही कायम असल्याचे या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. उमरी नगरपरिषदेच्या निवडणुकीत आमदार राजेश पवार यांच्या मदतीला मारोतराव कवळे गुरुजी उतरले होते; मात्र या दोघांनाही गोरठेकर बंधू पुरून उरले आहेत. भाजपला उमरीत केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. आमदाराच्या एककल्ली कारभाराचा फटका येथे असल्याचे सांगितले जात आहे.

किनवटमध्येही भाजपाचे आमदार भीमराव केराम यांना ‘जोर का झटका’ देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने नगराध्यक्षपदी विजय प्राप्त केला आहे. किनवट येथे महाविकास आघाडी यशस्वी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पाच आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तीन नगरसेवक येथे विजयी झाले आहेत. भाजपला २१ पैकी केवळ चार जागा जिंकता आल्या आहेत.

मुखेड नगर परिषदेत भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक यश मिळाले असले तरीही नगराध्यक्ष पद मात्र शिवसेना शिंदे गटाकडे गेले आहे. भारतीय जनता पार्टीने मुखेड नगर परिषदेत सर्वाधिक १४ जागा जिंकल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाने सहा जागांसह नगराध्यक्षपदी आपल्याकडे ठेवले आहे. या नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने शिवसेना शिंदे गटाशी युती केली होती. त्या युतीचाही भाजपला फटका बसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे येथे सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले भाजपाचे डॉ. तुषार राठोड यांना फटका सहन करावा लागला आहे.

भारतीय जनता पक्षाला जिल्ह्यात नगरपरिषद निवडणुकांमध्ये यश मिळाले असले तरीही अपेक्षित यश मिळाले नसल्याचे खासदार अशोकराव चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. यासाठी स्थानिक आमदारांना त्यांनी जबाबदार ठरवले आहे. स्थानिक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील नगरपरिषदांची जबाबदारी घेणे आवश्यक होते, असेही खा. चव्हाण यांनी सुनावले आहे. देगलूर, किनवटं आणि नायगावच्या आमदाराचे अपयश निश्चितपणे चिंताजनक असल्याचे पक्षपातळीवर सांगितले जात आहे.

आमदार श्रीजया चव्हाण यांचे पदार्पणातच सुयश..! भोकर मतदारसंघात आमदार श्रीजया चव्हाण या विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या नगरपरिषदांच्या निवडणुकीत त्यांना चांगले यश मिळाले आहे. भोकरसह मुदखेड नगरपालिकाही त्यांनी बहुमतासह भाजपाच्या ताब्यात ठेवली आहे. या विजयात माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचा मोठा वाटा आहे, हेही निश्चितच. भोकर नगर परिषदेत काँग्रेसने नगराध्यक्ष पदासह १३ नगरसेवक निवडून आणले आहेत तर मुदखेड नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासह १४ नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!