महापालिका

नांदेडच्या महापौर कविता मुळे यांनी साजरा केला बॅनरमुक्त वाढदिवस..!

आधी केले मग सांगितले... महापौरांनी सवंग प्रसिद्धीला दिला छेद, शंभर दिवसांच्या कृती आराखड्यात बॅनरमुक्त शहराचाही आहे उल्लेख

नांदेड – वाढदिवस म्हटले की आता पहिल्यांदा बॅनर, होर्डिंग्ज काढून स्वतःची प्रसिद्धी करण्याची हाव राजकारण्यांनाच नव्हे तर ज्यांना कोणी सार्वजनिक ठिकाणी कोणी ओळखतही नाही असे चेहरेही शहरातील प्रमुख चौकात विनापरवानगी लावलेल्या बॅनरवर मोठ्या प्रमाणात दिसून येतात; मात्र नांदेडमध्ये भाजपाच्या पहिल्या महापौर कविता संतोष मुळे यांनी या सवंग प्रसिद्धीला छेद देत स्वतःचा वाढदिवस बॅनरमुक्त करण्याचा निर्णय घेतला आणि तो अंमलातही आणला. माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत जाहीर केलेल्या नांदेड महापालिकेच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यात बॅनरमुक्त शहराचाही उल्लेख आहे. या संकल्पाची अंमलबजावणी त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाला केली आणि मग सांगितले. यातून शहरात आता विनापरवानगी बॅनरला थारा दिला जाणार नाही असा स्पष्ट संदेशच महापौर कविता मुळे यांनी दिला आहे.

जवळपास तीन वर्षाच्या प्रशासकीय कालावधीनंतर नांदेड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. यात नांदेडमध्ये भाजपाला प्रथमच घवघवीत यश मिळाले. नांदेडच्या पहिल्या भाजपा महापौर म्हणून कविता संतोष मुळे यांना संधी मिळाली. पदग्रहणाच्या सभेतच कविता मुळे यांनी ‘मी सावित्रीची लेक असल्याचे’ स्पष्ट करताना सामाजिक जाणीवेतूनच आपला कारभार राहणार असल्याचा संदेश दिला होता. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी याच जाणिवेतून गोवर्धनघाट भागातील शांतीधाम स्मशानभूमीला भेट दिली. तेथील दुरावस्थेची पाहणी करून तात्काळ दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्याचवेळी शहरातील विविध भागांना भेटी देऊन स्वच्छतेचीही पाहणी केली. त्यानंतर शहरातील प्रमुख कामांना प्राधान्याने पूर्ण करण्यासाठी शंभर दिवसांचा कृती आराखडा घोषित केला. ही घोषणा माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यामुळे १०० दिवसांच्या या कृती आराखड्याला विशेष महत्त्व आले होते. महापौर मुळे यांनी या शंभर दिवसांच्या कृती आराखड्याची अंमलबजावणी होण्यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यामुळे आता १०० दिवसांच्या कृती आराखड्यातील कामे वेग घेतील असे चित्र आहे. दुसरीकडे महापालिकेत दुसऱ्या मजल्यावर असलेल्या उपमहापौरांच्या दालनासमोर असलेल्या माजी उपमहापौरांचे छायाचित्र काढण्याचा निर्णय विद्यमान उपमहापौराने घेतला आहे. त्याची थेट अंमलबजावणीही केली आहे; पण दुसरीकडे महापौर कविता मुळे यांनी मात्र आपल्या दालनाबाहेरील एकाही माजी महापौरांचा फोटो काढला जाणार नाही, असा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयातूनही मोठा राजकीय संदेश गेला आहेच; पण त्याचवेळी त्यांच्या या निर्णयातून त्यांची राजकीय आणि सामाजिक प्रगल्भताही स्पष्ट झाली आहे.

महापालिकेच्या शंभर दिवसांच्या कृती आराखड्यातील बॅनरमुक्त शहर या एका विषयाची त्यांनी आज ११ मार्च रोजी आपल्या वाढदिवसानिमित्त थेट अंमलबजावणी करून दाखवली. शहरात एकही बॅनर आपल्या स्वतःच्या वाढदिवसाचे लावण्यात येणार नाही, याची खबरदारी महापौर कविता मुळे यांनी घेतली. महापौरांच्या वाढदिवसानिमित्त काही समर्थकांनी बॅनर लावण्याची तयारी केली होती; मात्र त्यांना महापौर मुळे यांनी रोखले आणि आपल्या वाढदिवसानिमित्त कुठेही बॅनर लावू नये अशा सूचना दिल्या. त्यामुळे त्यांचा वाढदिवस बॅनरमुक्त पद्धतीने साजरा झाला. त्याचवेळी महापौर कविता मुळे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी आज बुधवारी महापालिकेत दिवसभर गर्दी होती. त्यांच्या दालनात महापालिका अधिकारी, कर्मचारी, नगरसेवक, त्यातील अनेक मान्यवर, पत्रकार तसेच त्यांच्या चाहत्यांनी त्यांना वाढदिवसानिमित्त मोठ्या संख्येने उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!