
नांदेड – नांदेडमध्ये शनिवारी सर्वत्र ईदची नमाज अदा होत असतानाच नवीन नांदेड भागातील वाजेगाव बंधाऱ्याजवळ एक संशयास्पद घटना घडली आहे. दुचाकीला लागलेल्या आगीत एक व्यक्ती गंभीररित्या जळाला आहे. या घटनेचा पोलीस दल कसून आणि सर्व अँगलने तपास करत आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी इतवारा पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी घटनेची अधिक माहिती घेतली आहे. घटनेची चर्चा आता जिल्हाभर पसरली आहे.
नवीन नांदेड भागात गोदावरी नदीवर वाजेगावजवळ असलेल्या एका बंधाऱ्यावर जुन्या नांदेडातून वाजेगावकडे एका येणाऱ्या एका दुचाकीला शनिवारी सकाळी बंधारा संपताच आग लागली. या आगीत दुचाकीवरील व्यक्ती गंभीररीत्या जळाला आहे. या आगीदरम्यान अनेक लहान लहान स्फोटही झालेले दिसत आहेत. अनेक प्रत्यक्षदर्शींनी या घटनेचा मोबाईलवर व्हिडिओ घेतला असून घटनास्थळी मोठ्या प्रमाणात स्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेनंतर येथे मोठ्या संख्येने जमाव झाला होता. जमावातील नागरिकांनी जळालेल्या व्यक्तीला वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.
घटनेची माहिती मिळताच नांदेड ग्रामीण पोलीससह इतवारा पोलीस तसेच सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस दलाच्या वेगवेगळ्या विभागाकडून या घटनेची चौकशी केली जात आहे. तांत्रिक दृष्ट्याही या सर्व घटनेचा तपास पोलीस दलाकडून केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी इतवारा उपविभागीय कार्यालयात दाखल होत घटनेची माहिती घेतली. त्याचवेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनीही सर्व यंत्रणांना तपासाचे आदेश दिले आहेत. या घटनेची चर्चा मात्र जिल्हाभर होत आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी या घटनेबाबत माहिती देताना दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला असल्याचे सांगितले आहे. या घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मात्र अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता घटनेच्या तपासात नेमके काय निष्पन्न होते याकडेही लक्ष लागले आहे.



