महापालिका

नांदेडमध्ये चार शाळकरी मुलांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी महापालिकेचे दोन अभियंते निलंबित

कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन, प्लॉटधारक मो.युसुफ मकरानी यांच्यावर गुन्हा दाखल होणार, आयक्तांकडून २४ तासात कारवाई

नांदेड : नांदेड शहरात घडलेल्या चार शाळकरी मुलांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेची महानगरपालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. प्राथमिक चौकशी अहवालात कर्तव्यात कसुरी आणि निष्काळजीपणा आढळल्याने महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या आदेशानुसार संबंधित विभागातील पाच अभियंत्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे. त्याचवेळी कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन, प्लॉटधारक मो.युसुफ मकरानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचेही आदेश दिले आहेत.

देगलूर नाका परिसरातील एमजीआर गार्डनजवळ १६ एप्रिल रोजी इस्लामपुरा भागातील राहणारी १० ते १३ वयोगटातील चार मुले खड्यात साचलेल्या पाण्यात बुडाली. महापालिकेमार्फत या ठिकाणी नाल्याचे काम सुरु होते. त्याअनुषंगाने कामात निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत सार्वजनिक बांधकाम विभागातील उपअभियंता शिवकन्या जायभाये व कनिष्ठ अभियंता किरण सूर्यवंशी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

त्याचप्रमाणे कामावर पर्यवेक्षकीय अभाव असल्याचा ठपका ठेवत सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर तर पाणी पुरवठा व मलनि:स्सारण विभागाचे उपअभियंता प्रकाश कांबळे व कनिष्ठ अभियंता जकीउल्ला खान यांना कामात निष्काळजीपणा केल्याबाबत निलंबित का करण्यात येऊ नये? याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्याचवेळी सदरील दुर्घटनेस जबाबदार असलेल्या कंत्राटदार मे. गुरु रामदास कंस्ट्रक्शन, नांदेड तसेच संबंधीत कामाचे प्रकल्प अभियंता, प्रकल्प पर्यवेक्षक, कामावर देखरेख करणारे व्यक्ती व घटनास्थळाच्या पूर्वेस आयेशा पार्कमधील प्लॉटधारक मो.युसुफ मकरानी यांच्याविरुध्द पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यासाठी प्र.कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर यांना आयुक्तांनी प्राधिकृत केले आहे.

या घटनेचे गांभीर्य विचारात घेऊन महापालिका प्रशासनाने या प्रकरणाचा वस्तुनिष्ठ अहवाल महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागास व जिल्हाधिकारी यांना सादर करण्यासाठी प्र.कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर यांना आदेशीत केले आहे. त्याचप्रमाणे सदर दुर्घटनेस जबाबदार कंत्राटदार मे.गुरु रामदास कंस्ट्रक्शन, नांदेड यांना मृतांच्या नातेवाईकांना त्वरीत नुकसान भरपाई देण्याची कार्यवाही करण्यासाठी पालिकेमार्फत निर्देशित करण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी व राजीव गांधी अपघात विमा योजनेअंतर्गत मदत मिळण्यासाठीसुद्धा रितसर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. भविष्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडू नयेत यासाठी दक्षता घेऊन उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी सूचना दिल्या आहेत.

मृतांच्या कुटुंबाप्रती शासनाच्या संवेदना: पालकमंत्री अतुल सावे…शहरातील सार्वजनिक विकास कामात सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या प्रत्येक घटकावर कायदेशीर आणि प्रशासकीय कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृतांच्या कुटुंबाप्रती शासन संवेदना व्यक्त करत असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सर्व सुरक्षा मानकांचे कडक पालन करण्याचे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!