
नांदेड – नांदेड जिल्ह्याला ऑरेंज अलर्टनंतर आता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यामुळे नांदेडकरांची चिंता आणखीनच वाढली आहे. जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळपासून पुढील २४ तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. विष्णूपुरी प्रकल्पाचे १६ दरवाजे उघडून २ लाख २० हजार क्युसेस विसर्ग गोदापात्रात केला जात आहे. गोदावरी नदी आता नांदेडमध्ये जवळपास धोक्याच्या पातळीजवळ ३५३.९० मीटरवर वाहत आहे. महापुराच्या वाढत चाललेल्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड शहरातील ३०९ नागरिकांना निवारा केंद्रात स्थलांतरित करण्यात आले आहे. या महापुराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही जीवित हानी होणार नाही, यास प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यात मागील २४ तासात नांदेड जिल्ह्यातील ७ तालुक्यांमधील २५ मंडळात अतिवृष्टी झालेली आहे. जिल्ह्यातील सर्व मोठे, मध्यम व लघु सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेले असून सर्व धरणांमधून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग चालू आहे. जिल्ह्यातील सर्व नद्या दुथडी भरून वाहत आहेत. सद्यस्थितीत विष्णूपुरी धरणाचे १६ दरवाजे उघडले असून प्रकल्पातून २ लाख १९ हजार २२९ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात चालू आहे. गोदावरी नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदीची पाणी पातळी सध्या ३५३.९० मी. एवढी आहे. सद्यस्थितीत नांदेड जिल्ह्यास प्रादेशिक हवामानशाख विभागाने रेड अलर्ट दिला. जिल्ह्यात आज शनिवारी संध्याकाळपासून पुढील २४ तास पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. नदी, नाले, ओढे काठच्या गावांना तसेच जेथे पुरस्थिती उद्भवू शकते अशा गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याबाबत जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी आवाहन केले आहे. पूर परिस्थितीमध्ये मदत आवश्यक असल्यास तात्काळ स्थानिक तहसील कार्यालयास किवा जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्रास क्र. ०२४६२- २३५०७७ किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.
नांदेड शहर व परिसरातही सतत मुसळधार पाऊस होत आहे. गोदावरी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने नांदेड महापालिका आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी परिस्थितीचा तात्काळ आढावा घेऊन मनपाच्या सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. सर्व संबंधित क्षेत्रिय अधिकारी यांना टीम सतर्क ठेवावी आणि बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांना सतर्कतेबाबत तात्काळ आवाहन करावे, नदीकाठी असलेल्या मनपा हद्दीतील खडकपुरा, दुल्हेशाह रहेमान नगर, जी.एम.कॉलनी, गाडीपुरा कालापुल परीसर, गंगाचाळ, भिमघाट, नावघाट मल्ली परीसर, बिलाल नगर, पाकिजानगर, शंकर नगर, वसरणी इत्यादी सखल भागातील नाल्याकाठच्या वस्त्यांमध्ये परत नदीचे पाणी शिरत असल्याकारणाने बाधित नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठी कार्यान्वित केलेली निवारा केंद्र सुरू ठेवण्याच्या व आवश्यकतेनुसार केंद्रांच्या संख्येत वाढ करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बाधित क्षेत्रातील नागरिकांना आवश्यकतेनुसार निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित करणेसाठी तसेच सखल भागांत साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी वाहने व यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याची व्यवस्था यांत्रिकी विभागाने केली आहे. कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याकरिता महानगरपालिका सज्ज असुन क्षेत्रीय कार्यालय स्तरावर स्वच्छता निरीक्षक व वसुली लिपीकांमार्फत बाधित क्षेत्रातील नागरिकांना आवाहन करावे की, कोणीही नदीकाठी जाऊ नये, तथापि आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरीकांनी घाबरुन न जाता तात्काळ महानगरपालिकेच्या अहोरात्र सुरु असलेल्या नियंत्रण कक्षातील ०२४६२ -२६२६२६, २३०७२१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. नांदेड शहरात आतापर्यंत ३०९ नागरिकांना शहरातील विविध निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केले आहे.
शुक्रवारी रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार व संततधार पावसामुळे श्रावस्तीनगर, चुनाल नाला, तेहरा नगर, एमआर कॉलनी, भिमसंदेश कॉलनी, पंचशीलनगर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी गेले असून परिस्थिती अजून बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर ठिकाणी शोध व बचाव कार्य करण्याची आवश्यकता पडू शकते. त्यामुळे अग्निशमन विभागासोबत ( DRF पथक) शोध व बचाव कार्य करणेसाठी २० जीवरक्षकांची टीम सज्ज ठेवण्यात आली आहे.
कुठेही जीवित हानी होणार नाही यासाठी प्रशासन दक्ष – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले जिल्ह्यात गोदावरीसह आसना, मन्याड नदी धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत. पैनगंगा नदीलाही मोठा पूर असून खबरदारी गरजेची आहे. जिल्ह्यात ऑरेंज नंतर आता रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या काही गावामध्ये पाणी येईल. परंतु या पुराच्या पाण्यात कोणतीही जीवित हानी होऊ नये, यासाठी प्रशासकीय यंत्रणा दक्ष असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी खबरदारी घेत नदीकाठी तसेच ओढे, नाले या परिस्थितीत ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे. आसना नदीच्या पुरामुळे नांदेड तालुक्यातील निळा, एकदरा या गावातील नागरिकांना हलविण्यात आले आहे. गोदावरी नदीतून होणारा पाण्याचा विसर्ग लक्षात घेता तेलंगणातील पोचमपाड धरणातून आवश्यक तो विसर्ग करण्याबाबत सातत्याने संवाद साधला ठेवला जात आहे. जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा ‘ऑन फिल्ड’ असल्याचेही जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले
कुठेही जीवित हानी होणार नाही यासाठी प्रशासन दक्ष – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले 


