क्राईम

नीट पेपरफुटीमुळे नांदेड जिल्ह्यातील १५ हजारांहून  विद्यार्थ्यांचे टेन्शन वाढले..! पुन्हा द्यावी लागणार परीक्षा

पेपरफुटीची सीबीआय करणार चौकशी, नाशिकमधून नीट परीक्षेचा पेपर फुटला..?

नांदेड – भारतातील एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि पशुवैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाणारी एकमेव राष्ट्रीय स्तरावरील सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून या सर्व पेपर फुटीच्या प्रकरणाची चौकशी करण्याची जबाबदारी सीबीआयवर सोपविण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेत विद्यार्थ्यांची मात्र कोंडी झाली असून विद्यार्थ्यांसह पालकांवरही प्रचंड मानसिक ताण आला आहे. ही परीक्षा आता पुन्हा एकदा घेण्यात येणार असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सी द्वारा स्पष्ट करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील १५ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती.
नांदेड जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर तीन मे रोजी प्रथम सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेची तयारी विद्यार्थी दहावीनंतर लगेच सुरू करतात. त्यामुळे दोन वर्षापासून केलेली संपूर्ण तयारी आता पेपर फुटीच्या प्रकरणामुळे पाण्यातच गेल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यातील १५ हजार ८४० विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी १५ हजार ४५८ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेसाठी शहरी भागात २४ तर ग्रामीण भागात २२ परीक्षा केंद्र स्थापन केले होते. या केंद्रावर अतिशय कडक वातावरणात परीक्षा घेण्यात आल्या. या परीक्षेसाठी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी केंद्रावर मोठी गर्दी केली होती. विद्यार्थ्यांचे संपूर्ण भविष्य निश्चित करणारी ही परीक्षा अतिशय महत्त्वपूर्ण होती. यासाठी विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण कसब पणाला लावले होते.
यंत्रणेतील त्रुटीमुळे आणि भ्रष्टाचाराच्या वाळवीमुळे पेपर फुटीच्या शाप नीट परीक्षेला गेल्या अनेक वर्षापासून लागला आहे. गतवर्षीही नीटचा पेपर फुटला होता; मात्र परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला नव्हता. गतवर्षीच ही परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. २०२४ मध्येही नीटचे पेपर फुटल्याप्रकरणी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. ३ मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षा आता पुन्हा कधी घेतल्या जाणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. त्याचवेळी विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा आता या नीट परीक्षेची तयारी करावी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांचा ताण वाढला आहे. त्यात पालकांची चिंताही निश्चितपणे वाढलेलीच आहे. तीन मे रोजी झालेली नीट परीक्षा संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती. राजस्थान पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या तपासात अनेक धक्कादायक बावी पुढे आल्या आहेत. त्यामध्ये परीक्षेतील ७२० पैकी तब्बल ६०० गुणांचे प्रश्न दोन दिवस आधीच सीकर मधील विद्यार्थ्यापर्यंत पोहोचल्याचा दावा करण्यात आला आहे. शिरूर जिल्ह्यातील चूरू जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने १ मे रोजी सीकरमधील आपल्या मित्राला हे प्रश्न पाठवले होते. पुढे ही प्रश्नपत्रिका सीकरमधील एका संचालकाकडे पोहोचली. त्याने आपल्या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना ती दिली आणि पुढे ती इतर विद्यार्थी व कुरिअर समुपदेशकामार्फत पोहोचल्याचे हे स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांना मिळालेल्या कथित प्रश्नपत्रिका प्रश्नसंचकेत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र विषयाचे ३००हून अधिक हस्तलिखित प्रश्न होते.

महाराष्ट्रातील नाशिकहून फुटला नीटचा पेपर..?       तीन मे रोजी देशभरात झालेल्या नीट परीक्षेत जवळपास २२ लाखाहून अधिक विद्यार्थी समाविष्ट झाले होते. त्यात नांदेड जिल्ह्यातील १५ हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा समावेश होता. नीट परीक्षेच्या पेपर फुटीप्रकरणी झालेल्या तपासात महाराष्ट्रातील नाशिकमधून नीटचा पेपर फोडला असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील नाशिकमधून पुढे हा पेपर हरियाणात आणि नंतर राजस्थान, केरळ तसेच देशभरातील इतर राज्यांमध्ये पोहोचविण्यात आला आला असल्याची माहिती पुढे आली आहे. यासाठी लाखो रुपयांची उलाढाल झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. प्रति विद्यार्थी १५ ते ३५ लाख रुपये घेण्यात आल्याचेही तपासात पुढे येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!