क्राईम

नांदेडमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील प्रत्येक सामन्यावर कोट्यवधींचा सट्टा..! तरुणाई अडकली सट्टेबाजांच्या विळख्यात

पोलिसांकडून मात्र दर तीन-चार दिवसाआड नाममात्र कारवाई; अनेक जण झाले कर्जबाजारी, प्रत्येक चेंडू आणि धावेवर सुरू आहे सट्टा

नांदेड – देशात २२ मार्च ते २५ मे दरम्यान सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात कोट्यवधींचा ऑनलाईन सट्टा लावला जात असून यामध्ये नांदेड जिल्हाही मागे नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्याचवेळी या आयपीएल सामन्यावर ऑनलाइन सट्टा चालवणाऱ्यांविरुद्ध आतापर्यंत जिल्ह्यात कुठेही मोठी कारवाई झाली नाही. स्थानिक पातळीवर त्या त्या ठाण्यांकडून लहान मोठी कारवाई केवळ रेकॉर्ड दाखवण्यासाठीच सुरू असल्याचे स्पष्ट होत आहेत. प्रत्यक्षात करोडो रुपयांचा व्यवहार ऑनलाइन सट्टे बाजारामध्ये यामध्ये होत असून तरुणाई ऑनलाईन सट्टेबाजाराच्या आहारी गेली आहे. अनेक तरुण यामध्ये कर्जबाजारी होत असल्याचे चित्र आहे.

२२ मार्चपासून सुरू झालेल्या या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत २५ मे पर्यंत ७४ सामने खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत एकाच दिवशी दोन दोन सामनेही होत आहेत त्याचा सट्टेबाजांना लाभ होत आहे. यातून लाखो रुपयांची उलाढाल होत असून प्रत्येक चेंडूवर सट्टा लावला जात आहे. त्याचवेळी या स्पर्धेत निघणाऱ्या एकेका धावेवरही करोडो रुपयांची उलाढाल ऑनलाईन सट्टे  बाजाराच्या माध्यमातून होत आहे.  यामध्ये नांदेडही मागे नसल्याचे स्पष्ट आहे. नांदेडमध्ये ऑनलाईन सट्टेबाजारांचे मोठे नेटवर्क आहे. हे नेटवर्क व्हाया अकोल्यापासून मोठ्या महानगरापर्यंत हे पोहोचले आहे. त्यामुळे यातून होणारी उलाढाल ही सट्टा चालवणाऱ्यांसाठी मोठी संधीच आहे. त्यात ऑनलाइन माध्यमातून हा सट्टा लावला जात असल्यामुळे तरुणाई या सट्टेबाजारांच्या विळख्यात अडकली आहे.
या ऑनलाइन सट्टा बाजाराला रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून मात्र कोणतेही विशेष प्रयत्न होत नसल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात तीन-चार दिवसात एखादी कारवाई करून दाखवली जात आहे. अशीच कारवाई वजिराबाद पोलीस ठाणे हद्दीत स्थानिक गुन्हा शाखने केली आहे. १६ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास नांदेड येथे बाबादिपसिंग नगर बाफना  येथे हरजितसिंग पुरणसिंग चुग, वय ५६ वर्षे, व्यवसाय शेती रा. बाबादिपसिंग नगर बाफना नांदेड हे विना परवाना बेकायदेशिररित्या आयपीएल किक्रेट स्पर्धेतील दिल्ली कॅपीटल विरुध्द राजस्थान रॉयल क्रिकेट मॅच मोबाईलमधील किक्रेट माझा-11 ॲपवर पाहत किक्रेट मॅचवर सट्टा लावुन जुगार खेळत व खेळवित असतांना सापडले. एवढे पोलिसांनी कारवाई करून ११ हजार २५० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नागनाथ अहिल्याबाई हणमंतगोंडा तुकडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून  वजीराबाद पोलीस ठाण्यात कलम १२ (अ) म जुका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक माडगे हे करीत आहेत.

आयपीएल स्पर्धेतील प्रत्येक क्रिकेट सामन्यावरील ऑनलाइन सट्टे बाजाराचे हे नेटवर्क अगदी ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचले आहे. ऑनलाइन पद्धतीने मोबाईलच्या माध्यमातून अनेक जण या सट्टा बाजारात अडकले आहेत. हा ऑनलाईन सट्टा बाजार चालवणाऱ्यांनीही आपले जाळे अगदी गाव पातळीवर पोहोचविले आहे.  या ऑनलाईन सट्टा बाजारात अडकणाऱ्या युवकांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याला आता आळा घालण्याची मोठी जबाबदारी पोलीस दलावर असली तरीही पोलीस दलाकडून मात्र या बाबीकडे काना डोळाच केला जात आहे. यातही सट्टेबाजार चालवणाऱ्यांनी मांडलेले मोठे आर्थिक गणित कारणीभूत असल्याचे स्पष्ट आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!