राजकीय

नांदेडमध्ये भाजपाच्या संघटनात्मक निवडीत  देशमुख, पांडागळे आणि बारडकर यांच्यावर जिल्हा प्रवक्तेपदाची धुरा 

मूळच्या भाजपलाही चैतन्यबापू देशमुखांच्या रूपाने मिळाली पक्ष प्रवक्तेपदाची जबाबदारी 

नांदेड – भाजपाच्या संघटनात्मक निवडीत नांदेड जिल्हा प्रवक्तेपदी चैतन्यबापू देशमुख, संतोष पांडागळे आणि निलेश देशमुख बारडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १३ ऑक्टोबर रोजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या नियुक्त्या केल्या असून त्या तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आल्या आहेत. या पक्ष प्रवक्त्यांना सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

भाजपाच्या जिल्हा प्रवक्तेपदी निवड करण्यात आलेले संतोष पांडागळे यांनी काँग्रेसमध्ये असताना जिल्हा प्रवक्ते, मराठवाडा पातळीवर माध्यम समन्वयक म्हणून जबाबदारी पाडली होती. त्यांचा हा अनुभव लक्षात घेऊन भाजपातही त्यांना जिल्हा प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचवेळी भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत काम करणारे तसेच भाजपाचे मूळचे आणि निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे चैतन्यबापू देशमुख यांनाही जिल्हा प्रवक्ते पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. निलेश देशमुख बारडकर यांनाही भाजपाने जिल्हा प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपविली आहे. निलेश देशमुख बारडकर हे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढणारे पदाधिकारी म्हणून परिचित आहेत. जिल्हा प्रवक्ते पदाच्या या निवडी माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांच्या शिफारशीनुसार झाल्या आहेत. त्यांच्या हस्ते सोमवारी नवनियुक्त प्रवक्त्यांनी आपले नियुक्तीपत्र स्वीकारले. या तीनही प्रवक्त्यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण नांदेड जिल्हा असणार आहे.

भाजपात यापूर्वी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख म्हणून प्रल्हाद उमाटे यांनी जबाबदारी सांभाळली होती. त्यांना आता प्रवक्ते पदाची संधी उपलब्ध होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तसे झाले नाही. उमाटे हे माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीत चिखलीकर यांना पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पक्ष पातळीवर ऐन लोकसभा निवडणुकीत पक्षात प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी राज्यसभेची खासदारकी मिळवली. त्यात आता पक्ष संघटनेची धुराही आता त्यांच्याकडेच आली असल्याचे पक्षपातळीवर वेगवेगळ्या पदांवर होत असलेल्या निवडीवरून स्पष्ट होत आहे.  आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वेगवेगळ्या पदांवर नियुक्ती देण्यात येत आहेत. जिल्ह्यात तीन पक्ष प्रवक्ते नियुक्त करण्यात आले आहेत. यात आणखी काही प्रवक्त्यांची भर पडणार का हेही लवकरच स्पष्ट होणार आहे.

चैतन्य बापूवर दक्षिण विधानसभा समन्वयक पदाचीही जबाबदारी…महायुतीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी समन्वयक नेमले आहेत. यात भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एकेका समन्वयकाचा समावेश आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात भाजपाने समन्वयक म्हणून चैतन्यबापू देशमुख यांच्यावर जबाबदारी सोपवली आहे. आगामी काळात काँग्रेसकडे असलेला हा मतदारसंघ भाजपाकडे काबिज करण्यासाठी चैतन्यबापू देशमुख यांची महत्वाची भूमिका राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!