महापालिका

नांदेड महापालिकेसाठी जवळपास ६१ टक्के मतदान..! 

वसरणी प्रभागात सर्वाधिक तर सर्वात कमी मतदान भाग्यनगर प्रभागात, क्रॉस वोटिंगचा बहुतांश उमेदवारांना फटका, मतदान करताना अनेक मतदारांचा उडाला गोंधळ

नांदेड – नांदेड महापालिकेच्या २० प्रभागातील ८१ नगरसेवक पदासाठी झालेल्या निवडणुकीत जवळपास ६१ टक्के मतदान झाले आहे. या आकडेवारीत काही अंशी बदल होण्याची शक्यता आहे. त्याचवेळी वसरणी/कौठा प्रभागात सर्वाधिक ७३.५८ मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदानाची नोंद ही भाग्यनगर प्रभागात झाली. येथे ५१.७८ टक्के मतदान येथे झाले आहे. त्यामुळे वसरणी प्रभागात वाढलेली मते आणि भाग्यनगर प्रभागात कमी झालेली मते नेमकी कुणाच्या फायद्याचे ठरणार आहेत हे उद्या शुक्रवारी सकाळी स्पष्ट होणार आहे. त्याचवेळी मतदान प्रक्रियेदरम्यान अनेक ज्येष्ठ, अशिक्षित, महिला मतदारांना मतदान कसे करावे हे लक्षात येत नव्हते. त्यामुळे बहुतांश ठिकाणच्या मतदान केंद्रावरील अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदारांना मतदान प्रक्रिया समजावून सांगावी लागली. त्यात अनेक ठिकाणी क्रॉस वोट झाल्यानेही आता कोणाचा निकाल कसा लागेल, याकडेही लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या ८१ नगरसेवकांसाठी ६०० मतदान केंद्रावर गुरुवारी सकाळी साडेसात वाजेपासून मतदान सुरू झाले. ८१ नगरसेवक पदासाठी ४९१ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. मतदानाच्या पहिल्या दोन तासात केवळ ७.१६ टक्के मतदान झाले. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत मतदानाची ही टक्केवारी १७.१४ टक्क्यावर पोहोचली. दीड वाजता १ लाख ४८ हजार ४१ मतदारांनी मतदान केले होते. २९.५० टक्के मतदान झाले दुपारी साडेतीन वाजेपर्यंत मतदानाचा हा आकडा ४१.६५ टक्क्यांवर पोहोचला. २ लाख ९ हजार २५ मतदारांनी आपला हक्क दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बजावला होता. त्यानंतर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत साधारणता ६०.७९ टक्के मतदान झाल्याची माहिती पुढे आली आहे. त्यात ही अंतिम आकडेवारी नसल्याचे स्पष्ट करताना यात कमी अधिक बदल होईल असेही सांगितले जात आहे.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार महापालिकेच्या तरोडा खुर्द प्रभागात ५२.११ टक्के, तरोडा बुद्रुक प्रभागात ५५.२६ टक्के, सांगवी प्रभागात ५९.४८ टक्के, हनुमान गड प्रभागात ६०.२३ टक्के, भाग्यनगर प्रभागात ५१.७८ टक्के, गणेशनगर प्रभागात ५४.१३ टक्के, जयभीम नगर/ मगदूम नगर प्रभागात ५९.६२ टक्के, शिवाजीनगर प्रभागात ६०.३२ टक्के, नवीन मोंढा प्रभागात ५६.३६ टक्के, दत्तनगर प्रभागात ६१.७४ टक्के, हैदरबाग प्रभागात ६९.७३ टक्के, उमर कॉलनी प्रभागात ६८.०४ टक्के, चौफाळा/ करबला प्रभागात ६६.७५ टक्के, इतवारा मदिनानगर प्रभागात ६१.४५ टक्के, होळी /मन्यार गल्ली प्रभागात ६०.९६ टक्के, वजीराबाद/ गाडीपुरा प्रभागात ६१.४७ टक्के, गुरुद्वारा प्रभागात ५९.८१ टक्के, खडकपुरा/ देगावचाळ प्रभागात ६४.६३ टक्के, वसरणी/ कौठा प्रभागात ७३.५८ टक्के आणि सिडको/ वाघाळा प्रभागात ५८.५६ टक्के अशी मतदानाची नोंद झाली आहे.

प्रभाग पद्धतीने झालेल्या या निवडणुकीत मतदारांना मतदान करताना अनेक अडचणी आल्या आहेत. प्रत्यक्ष मतदान केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मतदारांना मतदान कसे करावे हे सांगावे लागले. महापालिका प्रशासन तसेच उमेदवारांकडूनही मतदान कसे करायचे याबाबत जनजागृती करण्यात आली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अनेक मतदार मतदान करताना गोंधळलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी मतदानावरील कर्मचारी, अधिकारी त्यांना सहकार्य करत होते; मात्र या सर्व बाबीत काही मतदान केंद्रावरील प्रतिनिधीकडून आक्षेपही घेतला जात होता. त्यामुळे मतदानाला मोठ्या प्रमाणात उशीर होत होता. त्यामुळे मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. दुसरीकडे अनेक प्रभागात क्रॉस वोटिंग झाल्याने निकालाचा अंदाज बांधणे भल्या भल्या राजकीय विश्लेषकांना आता जड जात असल्याचेही चित्र आहे. शुक्रवारी सकाळी दहा वाजेपासून शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात एकाच ठिकाणी २० प्रभागातील ८१ नगरसेवक पदासाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!