प्रशासकीय

नांदेड जिल्ह्यात कृषी मंत्र्यांची ‘ऑन दि वे’ पूरबाधित शेतीची पाहणी

ऑगस्ट अखेरील सर्व बाधित शेतक-यांच्या बँक खात्यात सोमवारपासून ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा निधी जमा होणार

नांदेड – राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड जिल्ह्यात दुसऱ्यांदा ‘ऑन दि वे’ पूर बाधित शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. यापूर्वीही कृषिमंत्री भरणे यांनी हदगाव तालुक्यातील मुख्य रस्त्यावरील शेतीमध्ये जाऊन शेतकऱ्यांना धीर दिला होता. अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण बाधित पीक क्षेत्राच्या प्रमाणात १०० नुकसान भरपाई मिळवणारा राज्यात नांदेड जिल्हा पहिला जिल्हा ठरला असल्याचे त्यांनी सांगितले. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील या शेतकऱ्यांसाठी १०० टक्के मदत निधी मंजूर करण्यात आला आहे. शासनाने तिसऱ्या टप्यात नांदेडसाठी ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा निधी मंजुर केला आहे. सोमवारपासून हा निधी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जाईल, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शनिवारी नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याच्या पिंपळगावला भेट देत बाधित क्षेत्राची पाहणी केली. यावेळी कृषीमंत्र्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यासोबत सरकारने शेतकऱ्यांसाठी मंजूर केलेल्या निधीबाबत माहिती देऊन, सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचा विश्वास दिला. नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत ६ लाख ४८ हजार ५३३.२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. यात जवळपास ७ लाख ७४ हजार ३१३ शेतकरी अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहेत. जिल्ह्यातील एकूण खरीप हंगाम पेरणी क्षेत्रापैकी अतिवृष्टी व सततचे पाऊसमानामुळे ८६ टक्के क्षेत्रावरील पीके बाधित होऊन नुकसान झालेली आहेत. जिल्हा प्रशासनाने या क्षेत्रावरील पीक व शेत जमीन नुकसानीचे पंचनामे अंतिम केलेले असून त्यानुसार सादर केलेल्या प्रस्तावात एकूण ५७४ कोटी २९ लाख ४३ हजार रुपयांच्या निधीची मागणी केली होती. नांदेड जिल्हा अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे एकूण बाधित पीक क्षेत्राच्या प्रमाणात १०० नुकसान भरपाई मिळवणारा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे. पीक नुकसानग्रस्त शेतक-यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम विशेष मोहीमेव्दारे सुरु असून मंजूर करण्यात आलेला निधी सोमवारपासून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात शेती पिकाचे झालेलं शेतकऱ्यांचं नुकसान भरून निघणार आहे, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड जिल्हा दौऱ्यादरम्यान दिलेल्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अर्धापूर, नांदेड, मुदखेड, कंधार, लोहा, मुखेड, देगलूर, बिलोली, धर्मावाद, नायगाव, किनवट, माहूर, हदगाव, हिमायतनगर, भोकर आणि उमरी तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने खरीप हंगामातील जिरायत, बागायत आणि फळ पिकांना मोठा फटका बसला. यात सोयबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, ज्वारी, भाजीपाला, हळद आणि केळी पिकांचं मोठं नुकसान झालं. त्यांचसोबत खरडून गेलेल्या व गाळ साचलेल्या जमिनीसाठी एकूण २०.८१ कोटी निधी देण्यात येणार आहेत.

सरकारने अतिवृष्टीतील पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन टप्प्यात मदत निधी जाहीर केला आहे. पहिल्या टप्यात जून आणि जुलै महिन्यातील नुकसानग्रस्तांसाठी ७३ कोटी ५४ लाख ३ हजार रुपये इतका निधी मंजूर झाला आहे. यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, हिंगोली, सोलापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्यात नांदेड जिल्ह्याला ५५३ कोटी ४८ लाख ६२ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे. यात जिरायती पिकांना ८५०० रुपये प्रति हेक्टर, बागायती पिकांना १७००० रुपये प्रति हेक्टर आणि फळ पिकांना २२५०० रुपये प्रति हेक्टर प्रमाणे निधी मंजूर करण्यात आला आहे. सध्या राज्यात पंचनाम्यांचं काम अंतिम टप्प्यात आले असून उर्वरित जिल्ह्यांना लवकरच नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही मदत जाहीर करण्यात आली आहे. शासन शेतक-यांना सर्वतोपरी मदत करण्यााृसाठी युद्धपातळीवर काम करत असल्याचेही कृषीमंत्री भरणे यांनी नमूद केले. नांदेड जिल्ह्यातील आमदार राजेश पवार, आमदार तुषार राठोड व आमदार बालाजी कल्याणकार यांनी या दौ-यादरम्यान कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची भेट घेऊन अतिवृष्टीसंदर्भात चर्चा केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!